
Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाचे 'ठाणे' कनेक्शन! मोठी अपडेट आली समोर
Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने भांडुप पश्चिम परिसरातून दोघांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी आठ पथके तयार केली आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जखमी केल्याचा आरोप आहे. त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करावे लागले. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर असताना हा हल्ला झाला होता.
दरम्यान आता मोठी अपडेट समोर आली आहे. ठाण्यातून चिराग नगर येथील तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चिरागनगर परिसरात हल्लेखोर राहत असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे मनसे पदाधिकारी आरोपींना शोधण्यासाठी जमले होते. यावेळी अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांच्या घरात पाहणी केली, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे.
संदीप देशपांडे शुक्रवारी (३ मार्च) मध्य मुंबईतील दादर परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले असताना काही लोकांनी त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅट आणि स्टंपने हल्ला केला. या हल्ला केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तीन ते चार जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्यात देशपांडे यांच्या उजव्या हाताला दोन फ्रॅक्चर झाले असून त्यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी ताब्यात घेतलेल्या दोन जणांना ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.