भरधाव कार उलटल्याने तिघे गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताचे सत्र सुरूच असून मंगळवारी सकाळी वाकण येथे भरधाव कार उलटल्याने तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

नागोठणे : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताचे सत्र सुरूच असून मंगळवारी सकाळी वाकण येथे भरधाव कार उलटल्याने तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. अपघातात कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

मुंबईहून माणगावच्या दिशेने जाताना वाकण नाक्‍यावर ही घटना घडली. रस्त्यावर भला मोठा खड्डा दिसल्याने भरधाव गाडीने अचानकपणे ब्रेक मारला. मात्र, नियंत्रण सुटल्याने जवळपास चार ते पाच वेळा उलटून गाडीचा अपघात घडला. यात हरलूद नावरे (63), म्हैमुणा नावरे (65) आणि अकसा नावरे (23) हे तिघे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी ही माहिती कळवताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी नागोठणे येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत अधिक तपास सुरू होता. 

खड्डे भरण्याची मागणी 

वाकण नाक्‍यावर ठिकठिकाणी मोठ्ठे खड्डे पडले असून, येथे वारंवार अपघात घडत आहेत. कार उलटून अपघात घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधीही येथे अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. महामार्गाच्या कामाचे ठेकेदार जे. एम. म्हात्रे कंपनीने या ठिकाणी तातडीने लक्ष देण्याची गरज असून खड्डे लवकर भरावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: three were seriously injured in the car collapsed