तिकीट घर खुलता खुलेना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

कल्याण - कल्याण पूर्वेतील नागरिकांसाठी रेल्वे स्थानकातून जाणारा स्कायवॉक बांधण्यात आला असून त्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट घर बांधण्यात आले आहे; मात्र तिकीट घर अजूनही सुरू झाले नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

कल्याण - कल्याण पूर्वेतील नागरिकांसाठी रेल्वे स्थानकातून जाणारा स्कायवॉक बांधण्यात आला असून त्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट घर बांधण्यात आले आहे; मात्र तिकीट घर अजूनही सुरू झाले नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

एमएमआरडीए, रेल्वे आणि कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सहकार्याने स्कायवॉकच्या कामाला २००९ मध्ये सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होऊनसुद्धा प्रशासन स्कायवॉक खुला करत नसल्याने सामाजिक संघटनांनी आंदोलन केले. त्यानंतर ‘आप’नेही संघर्ष केला. दुसरीकडे महापौर राजेंद्र देवळेकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण स्थानकाचा दौरा करत स्कायवॉकवरील सुविधांबाबत अधिकारी वर्गाला सूचना केल्या होत्या. ११ जानेवारीला कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी उपोषण करताच त्या दिवशी सायंकाळी पालिकेने स्कायवॉक खुला केला. स्कायवॉक खुला झाला तरी त्यावरील रेल्वेचे तिकीट घर अद्याप सुरू झालेले नाही.

प्रवाशांची पायपीट
कल्याण पूर्वेतून स्कायवॉकवर आल्यावर तिकीट घर बंद असल्याने पुन्हा खाली उतरून तिकीट काढून पुन्हा स्कायवॉकवर यावे लागते. त्यानंतर रेल्वे स्थानक गाठावे लागते. यात पायपीट तर होतेच, परंतु वेळसुद्धा वाया जातो. 

पालिकेने स्कायवॉकवर तिकीट घर बांधले असून ते पूर्ण झाले आहे. ते सुरू करण्याची रेल्वेची जबाबदारी आहे. याबाबत रेल्वेकडे पाठपुरावा करू.
- प्रमोद कुलकर्णी, पालिका शहर अभियंता

पालिकेने काम पूर्ण केले असले, तरी तेथे रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे काम सुरू आहे. येत्या काही महिन्यांत तिकीट घर प्रवाशांसाठी खुले केले जाईल.
- प्रदीपकुमार दास, रेल्वे स्टेशन मास्तर

Web Title: Ticket house kalyan railway station