राणीच्या बागेचे तिकिट पाचवरुन थेट शंभर रुपये!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

पाच रुपयांचे शुल्क 100 रुपये का करण्यात येणार आहे, हे पारदर्शकपणे का नाही मांडले? एखादा निर्णय घेताना त्याची पार्श्वभूमी जाणून घेणे, हा लोकांचा अधिकार आहे

मुंबई - सर्वसामान्य मुंबईकर व पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण केंद्र असलेल्या राणीच्या बागेतील शुल्कामध्ये महानगरपालिकेकडून तब्बल 95 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या पाच रुपये असलेले हे शुल्क एकदा 100 रुपये करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या बाजार उद्यान समितीत मंजूर करण्यात आला आहे. या शुल्क वाढीला सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

राणीच्या बागेमध्ये आता पेंग्विन दाखल झाल्यामुळे, तसेच इतर नवे प्राणी येणार असल्याने 100 रुपये करण्यात येणार असल्याचे कारण महानगपालिकेकडून देण्यात आले आहे. शुल्कवाढीचा हा प्रस्ताव लवकरच स्थायी समिती आणि महासभेतही मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. या निर्णयावर सामाजिक संघटनांकडून टीका करण्यात येत आहे.

"राणीची बाग हे प्रथमत: उद्यान असून मोकळी जागा हा नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे ही शुल्क वाढ चुकीची आहे,'' असे मत "सेव्ह राणी बाग बॉटनिकल गार्डन फांउडेशन'चे प्रतिनिधी व माजी पालिका आयुक्त असलेल्या द.मा.सुखटणकर यांनी सांगितले

"पाच रुपयांचे शुल्क 100 रुपये का करण्यात येणार आहे, हे पारदर्शकपणे का नाही मांडले? एखादा निर्णय घेताना त्याची पार्श्वभूमी जाणून घेणे, हा लोकांचा अधिकार आहे. लोकांची गर्दी कमी व्हावी म्हणुन पालिकेने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अशा खुल्या जागांवर नागरिकांना येण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. आम्ही माफक वाढ समजू शकतो. मात्र ही मनमानी वाढ हाणून पाडली पाहिजे,'' अशी तीव्र प्रतिक्रिया सुखटणकर यांनी व्यक्त केली.

या पार्श्‍वभूमीवर, आता महानगरपालिकेच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Ticket for ranicha baug shoots to Rs 100