प्रसूतीच्या वेळीही होतो,हिंसाचार आणि अत्याचार 

At the time of delivery is, violence and abuse
At the time of delivery is, violence and abuse

प्रसूतीच्या वेळी होणारे अत्याचार हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय; पण या विषयाकडे अभ्यासपूर्ण नजरेतून पाहत अनेक संस्था पुढे येऊन जनजागृती करताना दिसत आहेत. यापूर्वी सेहत नावाच्या संस्थेने हा विषय उजेडात आणला होता. "बर्थ इंडिया' या संस्थेतर्फेही हा विषय प्रकाशात आणण्याची धडपड सुरू आहे. त्यांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी प्रसूतीवेळी होणारे हिंसाचार आणि अत्याचार विषय मांडण्याचा हा प्रयत्न... 

रविवारी डॉक्‍टर डिलिव्हरी करत नाहीत. कारण, दवाखान्यात मदतकरणारे कर्मचारी सुटीवर असतात ना. तिच्या बरोबर मी गेले. सगळ्यांनी जबरदस्तीनं मला तिच्या बरोबर ढकललं. ती माझ्याशी चांगलं बोलते, माझं ऐकते म्हणून. मलाही तिचा चेहरा पाहवत नव्हता. तिच्या पोटात दुखत होतं. रिक्षानं तिला नेलं. डॉक्‍टरांनी तर दुसऱ्या दिवशी तिला आणायला सांगितलं होतं; पण तिच्या पोटात खूप दुखत असल्यानं तिची आजच डिलिव्हरी करावी लागणार, असं सांगून डॉक्‍टरला दवाखाना उघडायला लावला. मला वाटलं बाहेर बसायचं आणि बाळ झाल्यावर तिला घरी घेऊन जायचं. डॉक्‍टरनं मला आधी विचारलं,""तुम्ही घाबरणार नाही ना? मी नाही म्हणाले. पण मला कुठे माहीत होतं तिच्या बरोबर आत जावं लागेल ते. मला तीन मुलं झाली; पण आपण कधी बघतो का कसं बाळ होतं. त्या दिवशी मी बघितलं. त्यानंतर मलाडॉक्‍टरनं सगळं साफ करायला सांगितलं. त्यानंतर दोन दिवस मला अन्न जात नव्हतं.'' कोकणातल्या कळवली गावातली ही घटना. माझ्या शेजारी राहणाऱ्या सुनंदाकाकूंनी जेव्हा मला हा किस्सा सांगितला. तेव्हा मला काही सुचतच नव्हतं. मे महिन्यात घडलेली घटना 
त्यांनी जूनमध्ये परत आल्यावर सांगितली होती. घटना घडून बरेच दिवस उलटून गेले होते. त्या गावाला जाऊन आल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांनी हा किस्सा सांगितला होता. 


डॉक्‍टर प्रायव्हेट प्रॅक्‍टिस करणारा होता. पहिलटकरणीसाठी डॉक्‍टरनं देवपणा दाखविल्यासारखीच परिस्थिती होती. मातृत्वाचा काळ महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यातही प्रसूती म्हणजे बाईचा दुसरा जन्मच; पण या वेळी महिलांना मिळणारी वागणूक फार त्रासदायक असते. जणू शारीरिक अत्याचारच. हा अत्याचार होतो वैद्यकीय यंत्रणेत. सरकारी असो किंवा खासगी. कमी-अधिक फरकानं हा अत्याचार सुरूच असतो. नुकतंच सेहत संस्थेतर्फे एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात डॉ. सिमोन डिनिज या ब्राझीलच्या साऊ पॉलो युनिव्हर्सिटीतील डॉक्‍टरनं ब्राझीलमधील महिलांना प्रसूतीच्या वेळी येणारे अत्यंत भयावह अनुभव सांगितले. ब्राझीलमध्ये प्रसूतीत मानवीयता आणण्यासाठी त्यांनी एक चळवळ उभी केली आहे. त्यांचे अनुभव आणि भारतभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचे अनुभव यात फार तफावत नव्हती. महाराष्ट्र, गुजरात, चेन्नई, तमिळनाडू व दिल्ली या भागांतील कार्यकर्त्यांनी प्रसूतीच्या वेळी महिलांना आलेल्या अनुभवाचं विदारक सत्य मांडलं, तेव्हा अंगावर काटा उभा राहिला. मातृत्वातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या प्रसूतीवेळी येणाऱ्या अशा वाईट अनुभवांमुळेच महिला दुसऱ्या बाळंतपणाला नकार देतात हे ऐकून तर आनंदून जावं की खंत करावी, असा संभ्रम होतो. 


या वेळी दिल्लीच्या संस्थेतील एका कार्यकर्तीने दिलेल्या माहितीनुसार- दिल्लीत काही ठिकाणी एकच प्रसूति गृह आहे. प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर महिला येतात. रांगेत उभ्या राहतात. 


डिलिव्हरी झाल्यानंतर रुग्णालयानं प्रसूतीसाठी दिलेला गाऊन काढून घेतला जातो. तिच्या हातात तिचं मूल दिलं जातं आणि प्रसूतीवेळी सांडलेलं रक्त आणि इतर सर्व तिला साफ करावं लागतं. हे झाल्यानंतर त्याच टेबलवर त्याच गाऊनमध्ये दुसऱ्या महिलेची प्रसूती होते. प्रसूतीनंतर रूम, टेबल व तिचा गाऊन स्वच्छ असणं ही बाळ झालेल्या बाईची जबाबदारी असते. रुममधून बाहेर पडताना उशीर झाला,रूम, टेबल खराब असेल, तर बाहेर उभ्या असलेल्या दुसऱ्या बाईचे नातेवाईक तिला रागवतात. 


याच चर्चासत्रात मुंबईतील केईएम रुग्णलयातील ज्येष्ठ प्रसूती तज्ज्ञ डॉ. पद्मजा मवानी यांनी ही बाब मान्य केली. गरोदरपणा हा आजार मानणारे लोक आहेत. प्रसूती प्रक्रियेत मानवीयता आणण्यासाठी माणसांबाबत बोलताना आपण अवयव आणि शरीर असाच विचार करतो. हा विचार बदलण्याची आवश्‍यकता असल्याचं त्या म्हणाल्या,""यावेळी त्यांनी अधोरेखित केलेला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी यंत्रणेत रुग्णांशी साधला जाणारा संवाद. रुग्णसंख्येमुळे हा संवाद क्‍या हो रहा है, इधर आओ, उधर बैठो, दवाई लो इतकाच सीमित असतो, असं त्यांनी स्पष्टच सांगितलं. रुग्ण, माता व डॉक्‍टर यांच्यामध्ये जो संवाद, जी आपुलकी असली पाहिजे ती नसल्याचं त्यांनी या वेळी अधोरेखित केले. त्यांचं हे मत, मातृत्वाच्या काळातील महिलांचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा आहे. तसंच प्रसूतीवेळी महिलांना सर्वाधिक मदत होते ती आयाबाई, मदतनीस यांची. डॉक्‍टरांपेक्षा त्यांच्याकडून होणारा त्रास मोठा असतो, असे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं. अनेकदा अर्वाच्य शब्दात महिलेशी बोलणं महिलांना त्रासदायक असतं. हैदराबादमध्ये रुग्णालय चालविणाऱ्या एविटा फर्नांडिस यांनी त्यांच्या रुग्णालयात चालविलेला उपक्रम या वेळी सांगितला. या आयांच्या मदतीने सुरक्षित आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात प्रसूती करण्यावर त्यांच्या रुग्णालयात भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बर्थ इंडिया या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात आणि प्रसूतीवेळी होणाऱ्या त्रासामुळे घरात प्रसूती करण्यासाठी विचारणा होत असल्याचे सांगितले; जे धक्कादायक होते. बाळाचं डोकं खाली आलं का हे तपासण्या साठी अनेकदा योनीमार्गात बोट घालून पाहिलं जातं. वारंवार असं करणं हेही मानव अधिकाराच्या विरोधात असल्याचं मत या वेळी मांडण्यात आलं. अनेकदा महिलांवर सीझेरियन लादलं जातं, ते का केलं जातं किंवा का करणं आवश्‍यक आहे याबाबत कोणतीच माहिती महिलेला दिली जात नाही. ही माहिती तिला मिळणं हा तिचा अधिकारच आहे. तसंच सीझेरियनसाठी महिलेच्या ओटीपोटात येणारी चीर किंवा प्रसूतीवेळी योनीमार्गात दिली जाणारी चीर या दोन्ही गोष्टी मानवाधिकाराचं उल्लंघन करतात. एका अहवालानुसार पाचपैकी एका महिलेवर प्रसूतीवेळी अत्याचर होतो, असं डिनिज यांनी सांगितलं. डिनिज यांनी दिलेल्या माहितीनुसार,"ब्राझीलमध्ये काही ठिकाणी 100 टक्के सिझेरियन होतं. भारतातही गरज नसताना महिलांवर सिझेरियन लादण्यात येतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. पण, या सर्वांचं मूळ म्हणजे त्यासाठी पुरेशा संख्येनं प्रसूतिगृहं असणे. मनुष्यबळ आणि कुशल कर्मचारी असणे या बाबीही दुर्लक्षित करता येणार नाहीत. आश्‍चर्य म्हणजे आदिम काळापासून असलेल्या प्रसूती प्रक्रियेत माणुसकी यावी म्हणून इतक्‍या वर्षांनी प्रयत्न होणार आहेत. 


डब्ल्यूएचओने2014 मध्ये प्रसूतीवेळी महिलांवर अत्याचार आणि त्रास होऊ नये या साठी सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार 90संस्थांनी एकत्र येऊन या विचारावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, आजही महिलांवरील या अत्याचाराबाबत महिला मोकळेपणी बोलत नाहीत; तर हा अत्याचार दूर होण्यासाठी प्रयत्न कसा आणि कोण करणार. महिलेच्या प्रसूतीवेळी तिच्या जवळची व्यक्ती, मग तो नवरा किंवा आई किंवा बहीण किंवा एखादी मैत्रीण सोबतीला असावी, असा नियम असावा आणि तो पाळण्यात यावा. प्रसूतीवेळी महिलांना डॉक्‍टरांबाबत विश्‍वास वाटावा यासाठी त्यांच्यात मैत्रीपूर्ण नातं असावं. प्रसूती कक्षात मदत करणारे कर्मचारी हे प्रशिक्षित आणि आपुलकीनं काम करणारे असावेत. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com