पडेल ते काम, मिळेल तो पैका  30 टक्के घरेलू कामगार महिलांचा रोजगार हिरावला 

पडेल ते काम, मिळेल तो पैका  30 टक्के घरेलू कामगार महिलांचा रोजगार हिरावला 

मुंबई : पडेल ते काम आणि मिळेल तो पैसा स्वीकारण्याची वेळ घरेलू कामगार महिलांवर आली आहे. कोरोनाचा फटका या महिला कामगारांना बसला असून त्यांना काम मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरोनाने राज्यभरातील 30 टक्कके घरेलू कामगार महिलांची रोजी रोटी हिरावून घेतली आहे.

शीव प्रतीक्षानगरमध्ये राहणाऱ्या सुनीता लोखंडे या एका डॉक्‍टरच्या घरी स्वयंपाक तयार करण्याचे काम करीत होत्या. त्यातून त्यांना महिन्याला पाच हजार रूपये मिळत होते. त्या अन्य दोन घरात दुपारचे जेवण बनवण्याचे काम करीत होत्या. अशा प्रकारे महिन्याला साधारणत: 15 हजार रूपये त्यांच्या हातात पडत होते. लॉकडाऊनपासून त्या घरीच आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर त्यांनी पुर्वीच्या ठिकाणी पुन्हा काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सध्या नको नंतर बघू असे सांगण्यात आले. 
सुनीता यांचे पती आजारी आहेत. त्यामुळे ते घरीच असतात. त्यांना तीन मुले आहेत. एक मुलगी महाविद्यालयात तर दोन मुले शाळेत शिक्षण घेत आहेत. सुनीता यांनी उधार पैसे घेऊन आपल्या मुलीचे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. मुलांचे शाळांचे शुल्क अद्याप भरायचे आहे. ते कसे भरायची याची चिंता त्यांना आहे. इतकेच नाही तर रोजच्या रोजी रोटीची व्यवस्था करण्यासाठी ही त्यांना वणवण भटकावे लागत आहे. 

अशी परिस्थिती केवळ सुनीता यांचीच नाही तर बहुसंख्य घरेलू कामगार महिलांची आहे. अनेक महिला घराघरात धुणीभांडी, साफसफाई, जेवण बनवणे तसेच इतर कामे करीत असत. त्यातून त्यांचा उदारनिर्वाह चालत होता. लॉकडाऊनच्या गेल्या पाच महिन्यांपासून त्याची ठरलेली काम बंद झाली आहेत. आता जरी अनलॉकची प्रक्रीया सुरू झाली असली तरी त्यांना जुन्या ठिकाणी काम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या महिलांची फरफट सुरू आहे. 
राज्यभरात 50 हजाराहून अधिक नोंदणीकृत घरेलू काममगार महिला आहेत. त्यांचे हातावर पोट आहे. त्यातील साधारणत: 18 हजार महिलांचा रोजगार बंद झाला आहे. 30 टक्के महिलांचा रोजगार हा कायमस्वरूपी हिरावला आहे. बाकी कामगार आता कामाच्या शोधात दिवसभर वणवण भटकतात. 

अनेक महिला कामगार नाक्‍यावर कामाच्या शोधात उभ्या राहतात. त्यातील काही महिलांना कधीकाळी काम मिळते. त्यामुळे पदरात कधी दोनशे तर कधी तिनशे रूपये पडतात. मात्र या ही कामाची शाश्वती नसून आठवड्याला एखाद दुसरे काम मिळते. 
- वंदना मोरे, घरेलू कामगारे 

 

कौटुंबिक सुरक्षा लक्षात घेऊन बाहेरच्या व्यक्तींना घरात प्रवेश देणे धोक्‍याचे आहे. कोरोना रूग्ण वाढत असल्याने योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. आमच्याकडे धुणीभांडी, जेवण तसेच घरकामासाठी एक महिला आहे. मात्र सध्या खबरदारीचा उपाय म्हणून तिचे काम थांबवायला सांगितले आहे. घरातील व्यक्तींनी कामे विभागून घेतली आहे. 
- संदीप साळंखे, व्यवसायिक 

 

अनलॉकनंतर परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती. मात्र परिस्थिती बिकट आहे. 30 टक्के घरेलू कामगार महिलांचा रोजगार हिरावला आहे. सरकारने याची दखल घेऊन या महिलांना मासिक भत्ता सुरू करण्याची गरज आहे. शिवाय लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. 
- नरेश राठोड, अध्यक्ष, अखिल भारतीय घरेलू कामगार सेवा संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com