
मलिकांना कोठडीत घरचे जेवण!
मुंबई, ता. २४ : मनी लॉंडरिंग प्रकरणात बुधवारी अटक करण्यात आलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या तीनही मागण्या विशेष न्यायालयाने आज मान्य केल्या. त्यानुसार मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कोठडीत घरचे जेवण देण्याची परवानगी देण्यात आली.
गॅंगस्टर दाऊद इब्राहिमच्या बेनामी मालमत्तांच्या व्यवहारांप्रकरणी ‘ईडी’ने नवाब मलिक यांना बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. आज त्यांच्या वतीने ॲड. भूमिका गडा यांनी मलिक यांना घरचे जेवण, वकिलांची हजेरी आणि औषधे घेण्याबाबत अर्ज केले होते. त्याला विशेष न्यायालयाने मान्यता दिली. ‘ईडी’चे अधिकारी चौकशी करत असताना त्यांचे वकील काही अंतरावर (चौकशी ऐकू येणार नाही एवढ्या) हजर राहू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
‘एनआयए’ने दाऊदच्या विरोधात बेकायदेशीर कारवाया अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ईडीने तपास सुरू केला असून त्याच्या काही मालमत्तांची बहीण हसीना पारकरने विक्री केली. यातील व्यवहारांबाबत मलिक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून ‘ईडी’ने चौकशी सुरू केली आहे. माझ्या विरोधात कोणताही पुरावा नसताना आणि नोटीस न देता गैरप्रकारे मला अटक केली, असे बुधवारी मलिक यांनी न्यायालयात सांगितले होते.
------
‘ईडी’ने घेतल्या कासकरच्या सह्या
मनी लॉंडरिंगप्रकरणी दाऊदशी संबंधित प्रकरणात त्याचा भाऊ इक्बाल कासकरला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने आज दिले. कासकर सध्या खंडणीच्या प्रकरणात ठाणे कारागृहात होता, त्याची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात येणार आहे. दरम्यान, ‘ईडी’ने चौकशीदरम्यान इंग्रजी लिहिलेल्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या. मला इंग्रजी वाचता येत नाही, त्यामुळे त्या कागदावरील मजकुरासाठी मी बांधील नाही, असे या अर्जामध्ये म्हटले आहे. कासकरचे वकील सुलतान खान यांनी हा अर्ज न्यायालयात दाखल केला.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..