
दोन दिवसांत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक
मुंबई, ता. १० : मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया पुढील दोन दिवसांत जाहीर होणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता. ११) शालेय शिक्षण विभागाकडून घोषणा केली जाणार असल्याचे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहावीच्या लेखी परीक्षा पूर्ण होताच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेशाचा पहिला टप्पा भरून घेतला जातो; मात्र या वेळी तांत्रिक अडचणींमुळे ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी मागील आठवड्यात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पुण्यात बैठक घेऊन त्यांच्या मंजुरीसाठीचा अहवाल मंत्रालयात पाठवला. त्यासाठी पुढील दोन दिवसांत मंजुरी मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रांत मागील वर्षी राबवण्यात आलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशात हजारो जागा रिक्त राहिल्या हेात्या. मुंबई महानगर क्षेत्रात तब्बल ६६ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे त्या जागांवर यंदा लक्ष ठेवले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..