मुंबईतील रिअल अन्‌ `रिल` लाईफ हिरो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील रिअल अन्‌ `रिल` लाईफ हिरो
मुंबईतील रिअल अन्‌ `रिल` लाईफ हिरो

मुंबईतील रिअल अन्‌ `रिल` लाईफ हिरो

sakal_logo
By
सदर - ऑन ड्युटी मुंबईतील रिअल अन्‌ ‘रिल’ लाईफ हिरो - रोहिणी गोसावी पोलिसाची नोकरी म्हणजे दिवसाचे २४ तास कमी पडतील, एवढे काम आणि कामाचा जीवघेणा दबाव. या सगळ्यात पोलिसांना कुटुंबीयांसाठी वेळ देण्यासही सवड नसते. त्यामुळे व्यक्तिगत छंद जोपासण्याची गोष्ट त्यांच्यासाठी दूरच; पण मुंबई पोलिस दलात काम करणारे नंदू सावंत या सगळ्याला अपवाद आहेत. ते पोलिस दलात कर्तव्य तर बजावतातच; परंतु त्यासोबत अभिनय आणि कवितेचा छंदही त्यांनी जोपासला आहे. शाळा-महाविद्यालयीन जीवनापासून अभिनयाच्या आवडीने त्यांच्या रूपाने मुंबई पोलिसांना एक चांगला अभिनेता मिळाला आहे. त्यांनी पोलिस दलातील अभिनेत्यांची टीम तयार करून, राज्य नाट्य स्पर्धेतील अनेक बक्षिसेही खेचून आणली आहेत. --------------- शाळा-महाविद्यालयामध्ये नंदू सावंत यांचा अभिनय आणि कवितेचा छंद १९८७ ला पोलिस दलात आल्यावर काहीसा मागे पडला होता. हाडाचे कवी आणि अभिनेते असलेले सावंत त्यामुळे अस्वस्थ होते. काहीही करून पुन्हा कविता आणि अभिनय सुरू करायला हवे, या भावनेने त्यांना पछाडले होते. शेवटी १९९२ मध्ये त्यांनी ठरवून त्यांच्यासारख्याच काही मित्रांना जमवले आणि अभिनेत्यांची टीम तयार केली. त्यांच्या काही मित्रांनी ‘हे पोलिसांचे काम नाही’, असे म्हणत त्यांची हेटाळणी केली; तरीही त्यांनी १९९२ च्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आणि प्राथमिक फेरीत पहिला क्रमांकही पटकावला. त्यानंतर सावंत यांचा अभिनयाचा प्रवास पुन्हा सुरू झाला. तेव्हापासून दर वर्षी राज्य नाट्य स्पर्धेत मुंबई पोलिसांचे एक नाटक असते. सुरुवातीला त्यांची हेटाळणी करणारे मित्रही आता आवर्जून त्यांची नाटके बघायला येतात आणि कौतुक करतात. या टीमने सादर केलेली काही नाटके आजही दूरदर्शनवर प्रसारित केली जातात. राज्य नाट्य स्पर्धेत नाटकासोबतच सावंत यांनी ‘लक्ष्य’, ‘नकुशी’, अशा जवळपास १० टीव्ही मालिका, ब्रीथ वेबसीरिज आणि चित्रपटांमध्येही छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या आहेत. या प्रवासात त्यांनी केलेल्या नाटकांमध्ये ‘वाडा चिरेबंदी’ हे त्यांचे आवडते नाटक होते. नाटकाबरोबरच सावंत हे उत्कृष्ट कवीसुद्धा आहेत. महाविद्यालयामध्ये असताना ‘मी माझा’ या चारोळीने त्यांच्या कवितांना प्रेरणा मिळाली आणि कवितांचा प्रवास सुरू झाला. २०१३ मध्ये सावंत यांचे पोस्टिंग नागपाड्याला होते. तेव्हा मुंबईतील बेहरामपाडा, रेडलाईट परिसरातील वारांगनांचे आयुष्य त्यांना जवळून बघता आले. त्यांचे दु:ख, हालअपेष्टा बघून सावंत यांच्या ‘गावकुसाबाहेरचा उकिरडा’ या कवितेचा जन्म झाला. २०१८ मध्ये त्यांची ही कविता त्यांना बडोद्याला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सादर करण्याची संधी मिळाली आणि नंदू सावंत या पोलिसातील हळव्या मनाचा ‘कवी’ जनतेसमोर आला. नुकताच नाशिकला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांना गझल सादर करण्याची संधी मिळाली. खाकी वर्दीतील या नवख्या गझलकाराला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली. सावंत हे लवकरच पोलिस दलातून निवृत्त होणार आहेत. त्यानंतर पूर्ण वेळ कविता आणि अभिनय करण्याची त्यांची इच्छा आहे. -------------- शब्द आजुबाजूला फिरायला लागतात पोलिसांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये नंदू सावंत यांना कला सादर करण्याची संधी मिळते. पोलिसाची नोकरी करून हे छंद कसे जोपासता, असे विचारले तर सावंत आधी स्मित हास्य करतात आणि सांगतात... ‘दिवसभर कितीही काम करून घरी गेलो आणि जरा वेळ शांत बसलो, की शब्द आजुबाजूला फिरायला लागतात. त्यांना एकत्र करायला सुरुवात केली, की थकव्याची जाणीवच संपून जाते. शब्दांनी एक वेगळीच ऊर्जा मिळते, जी मला या ताणतणाव आणि धकाधकीच्या कामात तग धरायला मदत करते. काम करतानाही अनेक लोक असे भेटतात, की त्यांचे दुःख, त्यांचा त्रास बघून अस्वस्थ व्हायला होते. ही अस्वस्थता शब्दात उतरली, की मन हलके होते आणि पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. ...तरीही ड्युटी हीच प्राथमिकता नोकरी आणि छंद याची सांगड कशी घालता, हे सांगताना सावंत म्हणाले, की कधी-कधी नाटकाचा प्रयोग किंवा कविता सादरीकरणाच्या वेळी मोठा बंदोबस्त लागतो, तेव्हा आयोजकांना आम्ही विनंती करतो की प्रयोग थोडा पुढे ढकलावा. अनेकदा त्यांचे सहकार्य मिळते; पण पोलिसांचे काम हे आमची नेहमीच प्राथमिकता असते. तिला डावलून आम्ही छंद जोपासत नाही आणि नोकरी करून छंद जोपासण्यासाठी खास करून पोलिस दलातील नोकरी असेल तर आपल्या वरिष्ठांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो, असे नंदू सावंत सांगतात. त्यांच्या कामातही आजपर्यंत वरिष्ठांनी सहकार्य केल्याने ते इथपर्यंत पोहोचू शकले. त्यामुळे त्यांच्या मी कायम ऋणात राहीन, असेही ते म्हणतात.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top