मतमतांतरे

मतमतांतरे

मतमतांतरे मार्शल आहेत कोठे? मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. राज्य सरकारने नियम पाळण्याचे आवाहन करूनही जनता अजूनही बेफिकीर आहे. अनेक जण मास्कशिवायच फिरत आहेत. काही जणांचे मास्क तर नाकाऐवजी गळ्यात लटकत असतात. नियमभंग करणाऱ्यांकडून दंड आकारण्यासाठी मुंबई महापालिकेने मार्शलची नेमणूक केली आहे; पण ते लालबाग, परळमध्ये दिसत नाहीत. लालबागला हिरामणी मार्केटजवळ पोलिस चौकीसमोरच अनेक विक्रेते विनामास्क व्यवसाय करताना दिसतात. त्यांनाही पोलिस हटकत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर लालबाग मार्केट ते डॉ. एस. एस. राव रोड परिसरात अनेक जण मास्क न लावता फिरत असतात. कोणतेही नियम पाळत नाहीत. तिथे मार्शलनी रोज एक फेरी मारल्यास नियम न पाळणाऱ्यांना जरब बसेल. अरुण पां. खटावकर, लालबाग -- समाधानकारक प्रतिसाद महाराष्ट्रात १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी सुरू झालेल्या लसीकरणास पहिल्याच दिवशी समाधानकारक प्रतिसाद मिळाला. देशभरात ४० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण पहिल्या दिवशी झाले. पालकांच्या मनात आपल्या पाल्यांना लस कधी मिळणार, ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग, जवळ आलेल्या परीक्षा, मुलांना करोना संसर्ग झाला तर काय, लसीकरण न झाल्यामुळे मुलांवर असलेले वेगवेगळे निर्बंध आदी अनेक दडपणे होती. ती आता कमी झाली असून मुलेही न घाबरता लस घेत आहेत. केंद्र सरकारने लवकरच १० ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली असून ती रास्तच म्हणावी लागेल. गणेश हिरवे, जोगेश्वरी -- जुन्या प्रथांना कवटाळू नका! कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात एका महाविद्यालयात हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश करण्यावर बंदी घातल्यामुळे स्थानिक मुस्लिमांनी त्यास विरोध केल्याचे वृत्त वाचनात आले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या पोशाखाविषयी नियमावली जाहीर केली असून त्याअंतर्गत असा नियम केल्याचे सांगण्यात आले आहे. मुळात हिजाब परिधान करणे मुस्लिमांतील प्रथेचा एक भाग असला, तरी समाजात वावरताना शाळा-महाविद्यालये किंवा आस्थापनांमधील नियमांचे पालन करणे हेसुद्धा एक कर्तव्यच आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्याचे काही कारणच नाही. अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हिजाब परिधान करण्याला देशपातळीवर बंदी घातली आहे. २१ व्या शतकात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणाऱ्या मुस्लिम स्त्रियांमध्येही हिजाब परिधान करावा की नाही याविषयी मतभिन्नता आहे. दिवसभर हिजाब परिधान करणे स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्वच धर्मीयांनी जुन्या प्रथा-परंपरांना धार्मिक लेबले लावून कवटाळून ठेवण्याऐवजी पुरोगामी विचारांचा अवलंब करायला हवा! - मोक्षदा घाणेकर, काळाचौकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com