आत्मदहनाच्या तयारीत असणा-या कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आत्मदहनाच्या तयारीत असणा-या कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कामगारांचा आत्मदहनाचा प्रयत्न जिप्सम कंपनीकडून कामावर घेण्यास टाळाटाळ वाडा, ता. १५ ( बातमीदार ) ः तालुक्यातील नारे वडवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ‘सेंट गोबेन इंडिया’ ( जिप्सम) या कंपनीतील कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे यासाठी कामगारांनी अनेकदा आंदोलन केली. मात्र कंपनी प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याने संतापलेले कामगार आज तहसील कार्यालयासमोर जमले. अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी १९ कामगारांना ताब्यात घेतले. सेंट गोबेन इंडिया (जिप्सम) या कंपनीत पीओपी पावडर व सिटचे उत्पादन केले जाते. या कंपनीत अनेक स्थानिक कामगार काम करीत होते. कंपनी कोरोना काळात एक महिना बंद होती. त्यानंतर स्थानिक कामगारांना कामावर न घेता परप्रांतीय कामगारांची रिक्त झालेल्या जागी भरती केली गेली. कामगार कंपनीच्या गेटवर गेल्यास तुम्हाला कामावर नंतर घेऊ, असे सांगितले जात होते. मात्र, अनेक महिने उलटूनही कामावर घेतले जात नसल्याने कामगारांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत कुडूस नाका येथे रास्ता रोको आंदोलन करून कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर कंपनी प्रशासन, कामगार व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक वाडा तहसीलदारांनी बोलावली. हा विषय तहसीलदारांच्या अखत्यारित येत नसल्याने आम्ही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे तहसीलदारांना कंपनीने पत्राद्वारे कळवले. संतापलेल्या कामगारांनी बोईसरचे कामगार आयुक्त व वाडा तहसीलदार यांना निवेदन देऊन कामगारांना परत कामावर घ्या, अन्यथा शासकीय कार्यालय अथवा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. अखेर आज कामगार तहसीलदार कार्यालयासमोर जमले. ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी १९ कामगारांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास जाधव यांनी ‘सकाळ''शी बोलताना दिली. --------------------- १० जानेवारीला बैठक काँग्रेसचे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, पालघरचे जिल्हाधक्ष प्रफुल्ल पाटील, अनंता वनगा, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मिलिंद चौधरी यांनी कामगारांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी तहसीलदार उद्धव कदम यांची यासंदर्भात भेट घेऊन चर्चा केली. तहसीलदारांनी सोमवारी १० जानेवारीला कंपनी प्रशासन, कामगार आयुक्त, लोकप्रतिनिधी व कामगार यांच्यात बैठक बोलावून यावर मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com