Online Payment
Online Payment

ठाणे : फेरीवाल्यांकडून `ऑनलाईन` वसुली?

भाजप नगरसेवकाचा दावा; पालिकेला मजूर पुरवणारे कंत्राटदार सहभागी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ५ : ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्यानंतर ठाणे शहरातील फेरीवाल्यांचा विषय ऐरणीवर आला. पालिका अधिकाऱ्यांच्या चिरीमिरीमुळेच हे फेरीवाले मस्तवाल झाल्याची चर्चा त्यावेळी रंगली. पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकारानंतर प्रशासनाने फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली; परंतु त्यात सातत्य ठेवले नसल्याने आज संपूर्ण ठाणे शहरात फेरीवाल्यांना मोकळे रान मिळाले आहे. त्यातच पालिकेला मजूर पुरविणाऱ्या काही कंत्राटदारांना फेरीवाल्यांकडून कारवाई न करण्यासाठी ‘यूपीआय’द्वारे पैसे पाठविले जात असल्याची ठोस माहिती आपल्याकडे असल्याचा दावा भाजप नगरसेवकाने केल्याने सध्याच्या डिजिटल युगात `डिजिटल वसुली`ची चर्चा शहरात रंगली आहे. (Thane Latest News)

नगरसेवक वाघुले यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पत्र लिहिले आहे. त्यात अतिक्रम विभागात मजूर पुरविणाऱ्या काही कंत्राटदारांना फेरीवाल्यांकडून कारवाई न करण्यासाठी ‘यूपीआय’द्वारे पैसे पाठविले जात असल्याची ठोस माहिती आपल्याकडे आहे. कंत्राटदार-फेरीवाल्यांबरोबरच पालिकेच्या काही अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळे फेरीवाले फोफावले आहेत. पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना मुजोर फेरीवाल्यांकडून धमक्याही दिल्या जातात. या संदर्भात महापालिकेने चौकशी करावी. तसेच पोलिस बंदोबस्तात फेरीवाल्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही वाघुले यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास २७ जानेवारीपासून गोखले रोडवर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा वाघुले यांनी पत्राद्वारे दिला आहे. (Online Vasuli in Thane from Hawkers BJP Corporator alleges)

अशी कारवाई कशी चालेल?

१) रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांसंदर्भात पालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही.

२) काही वेळा रेल्वेस्थानक परिसरात अतिक्रमण विभागाची गाडी उभी केली जाते. काही कंत्राटी कर्मचारी फेरीवाल्यांबरोबर गप्पा मारताना आढळतात.

३) मजूर कंत्राटदाराचे काही कर्मचारीच बड्या फेरीवाल्यांना माल हलविण्यास सांगतात. विशेषतः भाजीविक्री करणाऱ्या महिलांच्या टोपल्या जप्त केल्या जातात.

४) काही छोट्या फेरीवाल्यांचा माल जवाहर बाग पेटी येथे नेला जातो. तो जुजबी दंडआकारणी करून परत दिला जातो.

५) अशा कारवाईमुळे फेरीवाले कमी कसे होणार, असा प्रश्‍नही वाघुले यांनी पत्रातून आयुक्तांना केला आहे. फेरीवाल्यांशी ‘दोस्ती’ कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ला आता महापालिकेच्या विस्मरणात गेला आहे. त्यामुळेच शहरात ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडलेले दिसते. रेल्वेस्थानकाच्या १५० मीटरपर्यंतच्या अंतरात फेरीवाल्यांना उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे ठाण्यात विशेषतः रेल्वेस्थानक परिसर, बाजारपेठेत शेकडो फेरीवाल्यांचा मुक्त संचार सुरू आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागात कर्मचारी पुरविणारे कंत्राटदार व फेरीवाल्यांची ‘दोस्ती’ झाल्यानेच फेरीवाल्यांचा मुक्त संचार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओळखपत्रच नाही पालिकेने आतापर्यंत पाच हजार १४१ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यांची कागदपत्रे तपासून त्यांना नोंदणी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय दीड वर्षापूर्वी घेण्यात आला. त्यातील सुमारे १८०० फेरीवाल्यांना या वर्षीच्या सुरुवातीपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र मिळवता आले आहे; तर अन्य फेरीवाल्यांना अद्यापही ओळखपत्र देण्यात आलेले नसल्याने त्यांना जागावाटप करण्यात आलेले नाही. त्यातही नौपाडा, कोपरी आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या २७८ फेरीवाल्यांचे ओळखपत्र अंतिम झालेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com