जंबो कोविड केंद्रांवरच कोविड रुग्णांचा भार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जंबो कोविड केंद्रांवरच कोविड रुग्णांचा भार
जंबो कोविड केंद्रांवरच कोविड रुग्णांचा भार

जंबो कोविड केंद्रांवरच कोविड रुग्णांचा भार

sakal_logo
By
जम्बो कोविड केंद्रांवरच रुग्णांचा भार आयसीयूची मागणी वाढली; २१ टक्के आयसीयू बेड भरले सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ५ : मुंबईतील नवीन कोविड रुग्णांची जबाबदारी जम्बो कोविड केंद्रांवरच असून गेल्या पाच दिवसांपासून आयसीयू बेडची मागणी वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे. पाच दिवसांपासून २१ टक्के आयसीयू बेड भरले असल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवरून स्पष्ट होत आहे. मुंबईत कोविडचा कम्युनिटी स्प्रेड झाला असून मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत; मात्र रुग्णसंख्या वाढली असली तरी ऑक्सिजनचा वापर फार कमी होत आहे. बुधवारी मुंबईत १५,१६६ रुग्ण सापडले. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कोविड आणि नॉन-कोविड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पालिकेच्या जम्बो कोविड केंद्रांत ३५ हजार ४८७ बेड सध्या आहेत. त्यातील १६ टक्के बेड भरले आहेत. म्हणजेच ५,६९५ रुग्णांना दाखल करावे लागले आहे. २,५८३ आयसीयू बेडपैकी ५४३ भरले आहेत. २,०४० रिक्त आहेत. म्हणजेच २१ टक्के आयसीयू बेड भरले आहेत. नेस्को जम्बो कोविड केंद्रात रुग्णांची संख्या १५० पर्यंत पोहोचली आहे. २६ डिसेंबरपर्यंत सात रुग्ण होते. नेस्को जम्बो केंद्राच्या अधिष्ठात्या डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिलेल्या माहितीनुसार १० जानेवारीपर्यंत सर्व २,७३८ बेड सक्रिय केले जाणार आहेत. आयसीयू बेडचीही मागणी वाढली आहे. आधी फक्त पाच आयसीयू बेड भरलेले होते. आता २० भरले आहेत. ऑक्सिजन लागत असला तरी कोणालाही जास्त व्हेंटिलेंटर्सची गरज भासत नाही. १० दिवसांत मुंबईची परिस्थिती बिकट मुलुंडच्या जम्बो कोविड केंद्रात दरदिवशी १०० रुग्णांना दाखल केले जात आहे. सध्या तिथे ३५० रुग्ण उपचार घेत आहेत. १० डिसेंबरपर्यंत १५ रुग्ण होते. ती संख्या ३५० पर्यंत पोहोचली आहे. ६० आयसीयू बेडपैकी १० भरले आहेत. ऑक्सिजन आणि आयसीयूची गरज भासत नाही; पण बेड पूर्णपणे भरलेले आहेत. परिस्थिती पुढच्या १० दिवसांत आणखी बिकट होईल. नागरिकांनी कोविडचे नियम पाळणे बंद केल्याने त्यातून संसर्ग पसरण्याची जास्त शक्यता आहे, असे मुलुंड जम्बो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे यांनी सांगितले. ... नायर रुग्णालयात बेड वाढवले नायर रुग्णालयातील बेड पुन्हा वाढवण्यात आले आहेत. आधी १०० बेड कोविडसाठी होते. ते आता वाढवून दोनशे केले गेले आहेत. त्यातील ३० बेड गर्भवती महिलांसाठी होते. ते वाढवून ७० केले गेले आहेत. पीआयसीयू आणि एनआयसीयूचे ३० ते ४० बेड तयार आहेत. आयसीयू बेड भरलेले नाहीत, पण एचडीयू सज्ज आहेत, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल म्हणाले. खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश मुंबईतील खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा काही दिवसांत दुप्पट होण्याचा धोका आहे. रुग्णालयांतील खाटांची गरज झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. झोपडपट्टी नसलेल्या भागातून ९५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असल्याने फक्त खासगी रुग्णालयांमध्ये खाटा शोधण्याला प्रचंड मागणी आहे. कोविड जम्बो केंद्र आणि पालिका रुग्णालयात जाण्यास रुग्ण नाखूश आहेत. म्हणून सर्व खासगी रुग्णालयांना निर्देश देण्यात आले आहेत, की त्यांनी दुसऱ्या लाटेच्या वेळी रुग्णशय्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्याप्रमाणे आताही द्याव्यात, असे आयुक्तांनी सांगितले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top