हस्तकला पेंटर्सच्या व्यवसायांवर गदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हस्तकला पेंटर्सच्या व्यवसायांवर गदा
हस्तकला पेंटर्सच्या व्यवसायांवर गदा

हस्तकला पेंटर्सच्या व्यवसायांवर गदा

sakal_logo
By
साईनबोर्ड रंगवणाऱ्या पेंटर्सवर उपासमारीची वेळ डिजिटल आर्टवर्कमुळे ८० टक्के रोजगार हिरावला सानपाडा, ता. ७ (बातमीदार) ः पूर्वी नवीन वाहनांची नंबरप्लेट बनविणे, सभा, उत्सव, कार्यक्रमांचे बॅनर बनविणे, नवीन घरावर नाव लिहिणे, निवडणूक प्रचारार्थ भिंती रंगविणे, भिंतीवर जाहिराती लिहिणे इत्यादी कामांसाठी हमखास पेंटर बाबूची गरज लागत असे. एक काळ असा होता, की शहरातील नाक्यांवर हाताने साइन बोर्ड बनवणाऱ्या आणि रंगकाम करणाऱ्या पेंटर्सची चलती होती. मात्र, आता डिजिटल आर्ट वर्कचा जमाना आल्यामुळे हस्तकलेच्या माध्यमातून पेंटिंग वर्क करणाऱ्या नवी मुंबईतील पेंटर्सच्या व्यवसायावर गदा आली आहे. सुमारे ८० टक्के व्यवसाय डिजिटल आर्टवर्कने व्यापल्यामुळे आता पेंटर्सना उरल्यासुरल्या मोजक्याच कामांवर गुजराण करावी लागत आहे. डिजिटल आर्टवर्कमुळे या पेंटर्सकडे येणारी मोठमोठ्या बॅनर्सची कामे लोप पावली. त्यानंतर त्यांची मदार वाहनांच्या नंबरप्लेट बनवण्यावर होती. मात्र, आरटीओने वाहनांच्या नंबरप्लेट संगणकाशी जोडल्याने आता ते कामदेखील त्यांच्याकडून कमी झाले आहे. डिजिटल आर्टवर्कची क्रांती झाली असली, तरी त्यामुळे हस्तकला, रंगकामावर उदरनिर्वाह करणाऱ्या पेंटर्सवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचा सुमारे ८० टक्के व्यवसाय यामुळे गेलेला आहे. नवी मुंबईत वाशी सेक्टर २ येथे बिग स्प्लेश हॉटेलसमोरील पदपथावर या पेंटर्सचा नाका आहे. पूर्वी २० ते २५ पेंटर्स असायचे जे दिवसाला ५०० रुपये तरी रोज कमवत होते. महागाई नसल्याने त्यात त्यांची व्यवस्थित गुजराण होत असे. मात्र, आता त्यांच्याकडे क्वचितच बॅंक, सोसायटी, शाळा यांच्या इमारती व कार्यालयांवर नावाच्या पाट्या रंगविणे, इमारतींमध्ये वाहनांच्या पार्किंगचे पट्टे आखणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे अशी तुरळक कामे येतात. ज्यातून कधी तरी हजार एक रुपये सरासरी मिळतात. मात्र, आजच्या महागाईत ते कमी पडत असल्याची खंत कोपरखैरणे येथे राहणारे पेंटर श्यामराव घुगे यांनी व्यक्त केली आहे. ------------- कधी कधी आम्ही मनपाच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भिंती रंगवण्याच्या कामासाठी हजेरीवर किंवा कामाचे स्वरूप पाहून दर ठरवून जात असतो. त्या कामांत पालिकेने आम्हाला सामावून घ्यायला हवे मात्र तसे होत नाही. आमची युनियन आहे; पण ती काहीच कामाची नाही. त्यामुळे आम्हाला कुणी गांभीर्याने घेतच नाही. आता हाताला काम नसल्याने आमच्यातील काही जण शिफ्टवर रिक्षा चालवतात. काही इमारतींमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतात. टेम्पररी कंडक्टरचे काम करतात. आमच्यातील जुनी पिढी वयोमानाने घरी बसली, तर काही देवाघरी गेले. पुढील काही वर्षांत आमच्यासारखे पेंटर नावालादेखील सापडणार नाहीत. - प्रकाश भिसे, पेंटर, तुर्भे स्टोअर्स
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top