कर्जत पालिकेला टोईंग व्हॅनची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत पालिकेला टोईंग व्हॅनची प्रतीक्षा
कर्जत पालिकेला टोईंग व्हॅनची प्रतीक्षा

कर्जत पालिकेला टोईंग व्हॅनची प्रतीक्षा

sakal_logo
By
‘टोईंग व्हॅन’अभावी वाहतूक कोंडी कर्जतमध्ये प्रवास नकोसा; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष कर्जत, ता. ९ (बातमीदार) : कर्जत शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘टोईंग व्हॅन’ हा पर्याय प्रभावी ठरेल, असे पालिका प्रशासनाचे मत आहे; मात्र या वाहनासाठी चार वर्षांत पाच वेळा निविदा काढल्यानंतरही शून्य प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासन हतबल आहे. ‘टोईंग व्हॅन’चे काम हे तोट्याचा व्यवहार ठरणार असल्याच्या शक्यतेमुळे कंत्राटदार पुढे येत नसल्याचे समजते. कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या दुतर्फा उभी राहणारी वाहने आणि बेशिस्त नागरिक यांच्यामुळे ही समस्या निर्माण होते. शहराची व्याप्ती वाढत असल्याने मुंबई महानगर प्रादेशिक प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कोट्यवधींचा खर्च करून शहरातील रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. त्यानंतर नव्याचे नऊ दिवस सरताच रस्त्यांवर भाजीवाले, हातगाडीवाले आणि बेकायदा पार्किंगमुळे समस्या वाढली. ही समस्या गंभीर असूनही लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याने नागरिकांत संताप आहे. शहरात ‘पे ॲण्ड पार्किंग’ची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे बाजारपेठेसह शासकीय कार्यालये, बँका आदी कामासाठी तालुक्यातून येणारे तसेच स्थानिक नागरिक रस्त्यातच वाहने उभी करतात. विशेषत: आमराई रोड, महावीर पेठ, मुख्य बाजार पेठ, डेक्कन जिमखाना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते पालिका कार्यालय आदी परिसरातील ही समस्या अधिक तापदायक आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून चार वर्षांपूर्वी अशा ठिकाणी बेकायदा उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईसाठी पालिकेने ‘टोईंग व्हॅन’द्वारे कारवाई सुरू केली होती; मात्र कंत्राटदाराचा एक वर्षाचा कार्यकाळ संपताच चार वर्षांत पाच वेळा काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या महिन्यात पाचवी निविदा काढण्यात आली होती. तिलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ‘टोईंग व्हॅन’ बंद आहे. .... ‘टोईंग व्हॅन’साठी पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे. या वाहनासाठी संबंधित परिवहन खात्याची आणि पोलिस प्रशासनाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. वाहन पार्किंग जागेची उपलब्धता होणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक बाबींची पूर्तता होत नसल्याने आतापर्यंत ‘टोईंग व्हॅन’साठी पाच वेळा निविदा काढूनही शून्य प्रतिसाद आहे. - डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी, कर्जत पालिका ... ‘टोईंग व्हॅन’साठी एकही कंत्राटदार पुढे येत नाही, असे उत्तर देऊन पालिका जबाबदारी झटकू शकत नाही. त्यावर अन्य उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. बेकायदा वाहने उभी असतील तर त्या वाहनांना पालिका कर्मचाऱ्यांकडून ‘जॅमर’ लावूनसुद्धा कारवाई करता येणे शक्य आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. - पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत. ... कंत्राटदारांसमोरील अडचण कर्जत शहरातील वाहनचालक दंड घेतल्यास वाद घालतात. दबाव टाकतात. काही जण तर हाणामारी करतात. त्यामुळे ‘टोईंग व्हॅन’बरोबर पोलिस बल पाहिजे; मात्र ते अपेक्षित असे मिळत नाही. ‘टोईंग व्हॅन’ वाहनाची देखभाल, कर्मचाऱ्यांचा पगार आदी खर्च वगळून कंत्राटदाराच्या हाती मनस्तापाशिवाय काहीच पडत नसल्याने निविदा भरत नाहीत, अशी माहिती एका कंत्राटदाराने दिली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top