इमारत सीलपासून दिलासा, परंतु कोरोनाबाधितांची जबाबदारी उचलावी लागणार, ठाणे पालिकेचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इमारत सीलपासून दिलासा, परंतु कोरोनाबाधितांची जबाबदारी उचलावी लागणार, ठाणे पालिकेचा निर्णय
इमारत सीलपासून दिलासा, परंतु कोरोनाबाधितांची जबाबदारी उचलावी लागणार, ठाणे पालिकेचा निर्णय

इमारत सीलपासून दिलासा, परंतु कोरोनाबाधितांची जबाबदारी उचलावी लागणार, ठाणे पालिकेचा निर्णय

sakal_logo
By
सोसायट्यांकडेच कोरोनाबाधितांची ‘जबाबदारी’ इमारत सीलच्या कारवाईपासून दिलासा; ठाणे पालिकेचा निर्णय सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ९ ः कोरोनाबाधित १० रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने अखेर मागे घेतला आहे. असे असले तरी यापुढे बाधित रहिवाशांची जबाबदारी मात्र सोसायटीतील इतर सदस्यांना उचलावी लागणार आहे. यामध्ये मुख्यत्वे बाधितांना घरीच स्थानबद्ध करण्याची धुरा संभाळावी लागणार असून, संबंधित कुटुंबाशी दैनंदिन संपर्क आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी राहणार आहे. तशा सूचनाच पालिकेने जाहीर केल्या आहेत. तसेच त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ठाणे पालिका क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मोठ्या गृहनिर्माण सोसायटी व इमारतीमध्ये असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संसर्ग नियंत्रणासाठी इमारतींमध्ये करावयाच्या उपाययोजनांकरिता पालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. या अनुषंगाने गेल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांची बैठक घेत १० पर्यंत रुग्ण एकाच इमारतीमध्ये आढळल्यास ती इमारत सील करण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र त्याला ठाण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांनी विरोध दर्शवल्याने पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पुन्हा सुधारित नियमावली जाहीर केली आहे. नवीन नियमावली... १) ठाणे पालिका क्षेत्रातील इमारती, गृहनिर्माण सोसायट्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये गृहविलगीकरणामध्ये असणाऱ्या कोविड सक्रिय रुग्णांना देखभाल करण्यासाठी सेवा देणारी व्यक्ती संपूर्ण कोविड लसीकरण घेऊन संरक्षित असल्याची खातरजमा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. २) कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना दैनंदिन मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत सदर संकुलातील व्यवस्थापकीय समितीने योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या इमारतीमध्ये वास्तव्यास असलेले इतर रहिवासी व कामाकरिता येत असलेले कर्मचारी यांनी कोविड- १९ सदृश लक्षणे असल्यास त्वरित कोविडची तपासणी करून घेणे बंधनकारक राहणार आहे. सात दिवसांचे होम क्वारंटाईन सक्तीचे इमारतीमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी एखाद्या रहिवाशाचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या तारखेपासून सात दिवस त्याला सक्तीने होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि निकटवर्तीयांना लक्षणे असल्यास त्वरित तपासणी करून घेणे बंधनकारक राहणार आहे. लक्षणे नसली आणि रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याच्या तारखेपासून पाच ते सातव्या दिवशी कोविडची पुन्हा तपासणी करणे बंधनकारक असणार आहे. वैद्यकीय कचऱ्यासाठी पिवळी पिशवी रुग्णांच्या घरातील जैववैद्यकीय कचरा उदाहरणार्थ मास्क, ग्लोव्हज, इंजेक्शन, सिरिंजेस, रेझर ब्लेड आदीचे वर्गीकरण करावे. तसेच हा कचरा मार्गदर्शक सूचनेनुसार पिवळ्या पिशवीमध्येच जमा करण्यास सांगितले आहे. जिल्ह्याची ऑक्सिजन क्षमता १२०० टन ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी प्राणवायूची (ऑक्सिजन) गरज असलेल्या रुग्णांची संख्या चार टक्के इतकीच आहे. तरीही गाफील न राहता भविष्यात ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सध्या जिल्ह्यात १२०० टन ऑक्सिजन उपलब्धतेची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एका दिवसाची सर्वोच्च रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्याला लागणाऱ्या ऑक्सिजनच्या तिप्पट ऑक्सिजनचा साठा असल्याचा दावा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केला आहे. जिल्हा आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध विभागांच्या प्रमुखांची ऑनलाईन बैठक रुग्णालयात उपचार घेत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. ८) घेतली. या वेळी ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेशातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, आरोग्य, नगर परिषदा यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रशासकीय तयारीची माहिती घेतली. या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील तयारीबाबत माहिती दिली. सावद रुग्णालयात हजार खाटा ग्रामीण भागातील शहापूर, भिवंडी, मुरबाड, बदलापूरमधील सर्व कोविड काळजी केंद्र कार्यान्वित झाले असून, भिवंडीजवळील सावद रुग्णालयात १०० खाटा उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले. ठाणे शहर आणि जिल्ह्यातील महापालिका व ग्रामीण भागात सध्या दिवसाला सात ते आठ हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण १० टक्के आणि ऑक्सिजन वापराचे प्रमाण चाचर टक्के असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. बदलापुरात कोविड रुग्णांची नोंदच नाही बदलापूर : बदलापूर पालिकेचा अजब कारभार नुकताच समोर आला आहे. पालिकेकडून रोज कोरोनाबाधित रुग्णांची यादी प्रसिद्ध केली जाते; मात्र या यादीत खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंदच केली नसल्याचे समोर आले आहे. बदलापुर शहरातदेखील कोरोना रुग्णांची रोजची संख्या दोनशेच्या घरात पोहोचली आहे. शहरातील रुग्ण व पालिका हद्दीतील रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येची नोंद केलेली यादी रोज पालिकेकडून प्रसिद्ध केली जाते; मात्र या यादीत शहरातील आशीर्वाद रुग्णालय व सेव्हन पाल्म रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असतानाही पालिकेच्या यादीत या रुग्णांची नोंदच नसल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात पालिकेच्या दुबे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांच्याशी संपर्क साधला असता, ते स्वतःच याबाबतीत अनभिज्ञ असल्याचे जाणवले. त्यांनी तात्काळ यासंदर्भात लक्ष घालून, योग्य ती आकडेवारी यादीत प्रसिद्ध केली जाईल असे सांगितले. गेल्या आठ ते १० दिवसांत अचानक वाढलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे आधीच आरोग्य यंत्रणेवर ताण पडला असून, यादीत या त्रुटी राहून गेल्याचेही त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top