मिनी़डोअर चालक आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकणार

मिनी़डोअर चालक आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकणार

सीएनजी परवान्यासाठी मिनीडोअर चालक आक्रमक पेण आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकणार  अलिबाग, ता. ११ (बातमीदार) : सीएनजी वाहनांची नोंदणी करण्यास पेण येथील उपप्रादेशिक कार्यालयाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे, असा आरोप करून या विभागाच्या कारभाराबाबत मिनीडोअर चालक, मालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी २४ जानेवारीला कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही रायगड जिल्हा मिनीडोअर चालक, मालक संघटनेने दिला आहे. याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाला निवेदन देण्यात आले.  रायगड जिल्ह्यात  गेल्या २० वर्षापासून मिनीडोअर चालक प्रवासी सेवा देत आहेत. जुना परवाना सहा आसनी रिक्षासाठी होते. परंतु महाराष्ट्र सरकारने सुरक्षित आणि आरामदायी प्रवास व्हावा यासाठी ४ जानेवारी २०१७  या दिवशी शिव ग्रामीण टॅक्सी योजना सुरू केली. या योजनेनुसार तीन चाकी, सहा आसनी रिक्षा परवान्यावर चार चाकी-सहा आसनी परवाने दिले. या जुन्या परवान्यावर हे चालक प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करीत आहेत. मात्र आरामदायी व सुरक्षित प्रवाशाच्या दृष्टीने तसेच प्रदूषणाचे निकष लावून वाहनांची वयोमर्यादा कमी केली. चार चाकी- सहा आसनी बदली वाहन योजनेला जिल्ह्यातील चालक व मालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तीन चाकी वाहने भंगारात टाकून त्याजागी चार चाकी वाहने कर्ज काढून घेतली. बीएस ६ मानांकनातील प्रवासी वाहनांसाठी इंधन म्हणून सीएनजीला मान्यता देण्यात आली आहे, असे मिनीडोअर संघटनेकडून सांगण्यात आले. परंतु जुना परवाना असलेल्या चार चाकी बीएस ६ मानांकनातील प्रवासी वाहनांस इंधन म्हणून सीएनजी वापरण्यास उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मान्यता देण्यात येत नाही.  त्यामुळे चालक व मालकांना केवळ पेट्रोलवर वाहन चालवावी लागत आहेत. वाढत्या पेट्रोलच्या महागाईचा फटका व्यवसायावर होत आहे. पेट्रोलमुळे प्रवासी सेवा देणे न परवडण्यासारखे होऊ लागले आहे. वर्षानुवर्षे प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील दोन हजारपेक्षा अधिक चार चाकी वाहन चालक, व मालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.     नव्याने येणाऱ्या मानांकनातील प्रवासी वाहनांना इंधन म्हणून सीएनजी वापरण्यास मान्यता देण्यात यावी. तसेच जुने वाहने भंगारात काढण्याची मुदत किमान दोन वर्षे अधिक देण्यात यावी, अशी मागणी गेल्या दोन वर्षापासून रायगड जिल्हा मिनीडोअर चालक मालक संघटनेकडून करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या या कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात आला असून २४ जानेवारीला पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला. ......  रायगड जिल्ह्यात बीएस ६ मानांकनातील एक हजार पेक्षा वाहने आहेत. यामधून दोन हजार पेक्षा अधिक चालक व मालकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पेट्रोल व सीएनजीची वाहने घेण्याबाबत सरकारकडून आदेश देण्यात आले. त्यानुसार वाहने खरेदी केली. पेट्रोलद्वारे वाहन चालविणे न परवडण्यासारखे आहे. त्यामुळे सीएनजीची नोंदणी करण्यासाठी वारंवार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अर्ज केला. परंतु त्याला मान्यता नसल्याचे सांगून नोंदणी केली जात नाही. त्यामुळे कार्यालयाला टाळे ठोकण्याची भूमिका घेतली आहे.  - दीपक म्हात्रे, कार्याध्यक्ष, रायगड जिल्हा मिनीडोअर चालक मालक संघटना -------------- निर्णयानुसार कार्यवाही बीएस ६ इंजिनच्या इको वाहनाला सीएनजी किटसाठी मान्यता देण्यात आली नाही. मात्र काही वाहन चालक बेकायदा किट बसवून नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारकडून सीएनजी नोंदणी करण्यास बंदी आहे. त्यामुळे हा गैरप्रकार रोखण्यासाठी सीएनजीसाठी नोंदणी केली जात नाही, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com