मुंबई
एमआयडीसीविरोधात लवकरच आंदोलन : जयंत पाटील
‘डोलवी’विरोधात लवकरच एल्गार
आमदार जयंत पाटील यांची घोषणा
वडखळ, ता. ११ (बातमीदार) : प्रस्तावित डोलवी एमआयडीसी विरोधातील संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.११) शेकापचे आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली. या वेळी पाटील यांनी एमआयडीसीविरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी गडब येथे बैठक घेण्यात येणार असून या वेळी निर्णय घेण्यात येणार आहे, अशी ग्वाही दिली.
डोलवी एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांनी गेल्या महिन्यात अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. आता हे शेतकरी राजकीय पाठिंबा मिळावा यासाठी सरसावले आहेत. त्यानुसार त्यांनी आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली. या वेळी पाटील यांनी सांगितले की, तुमच्या सोबत आहे. या भागाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. आजची तरुण पिढी सक्षम आहे. त्यांना विकास काय हे कळते. त्यामुळे विकासाची भाषा करणाऱ्यांनी स्थानिकांना काय हवे ते पहिल्यांदा पाहावे. जेएसडब्लू या खासगी कंपनीसाठी होऊ घातलेला एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा, या सरकारने म्हणणे ऐकले नाही तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल. त्यासाठी लवकरच गडब येथे शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, शेतकरी कमिटी संयोजक के. जी. म्हात्रे, गजानन पेढवी, विजय पाटील, सीताराम चवरकर, सदानंद ठाकूर, परशुराम म्हात्रे, देविदास म्हात्रे, प्रभाकर पाटील, एकनाथ म्हात्रे, के. पी. पाटील, दिलीप पाटील, दिनेश म्हात्रे, बळिराम कोठेकर, राजू पाटील, महेंद्र पाटील, प्रवीण म्हात्रे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
...
या आहेत मागण्या
डोलवी एमआयडीसी संघर्ष समितीच्या वतीने ११ गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी एमआयडीसीचे भूसंपादन रद्द करावे ही प्रमुख मागणी केली आहे. शेतात खाडीचे पाणी घुसल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, जेएसडब्लू कंपनीमुळे होणारे प्रदूषण रोखावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.