जे. जे. रुग्णालयातील अस्थायी सहायक प्राध्यापकांचे सामूहिक आंदोलन

जे. जे. रुग्णालयातील अस्थायी सहायक प्राध्यापकांचे सामूहिक आंदोलन
‘जेजे’तील अस्थायी सहायक प्राध्यापकांचे सामूहिक आंदोलन सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १२ : राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयांतील अस्थायी सहायक प्राध्यापकांनी राज्यभर सामूहिक आंदोलन पुकारले आहे. मंगळवारपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. बुधवारी (ता. १२) जे. जे. रुग्णालयातील सहायक प्राध्यापकांनी रुग्णालय परिसरात आंदोलन केले. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालयातील ५०० अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा आजही शासनाने नियमित केलेल्या नाहीत. त्यामुळे जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांसह राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील प्राध्यापकांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे. त्यासंदर्भात त्यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या आयुक्तांना साकडे घातले आहे. राज्यातील ५०० अस्थायी डॉक्टरांनी कोरोना संकटातही रुग्णसेवा बजावली. मात्र, सेवा कायम करण्याबाबत शासनाने कुठलीही दखल घेतली नाही, असा आक्षेप नोंदवण्यात आले आहे. ‘प्रत्येक चार महिन्यांनंतर आम्हाला कामावर रुजू होण्याचे आदेश दिले जातात. चार महिन्यांनंतर ते पुन्हा लागू होतात. असे काम दोन वर्षांपासून करणारे ५०० हून अधिक डॉक्टर आहेत. स्थायी तत्त्वावर आम्हाला कामावर रुजू करून घेण्यात यावे हीच आमची मागणी आहे. यातून आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देता येईल. अस्थायी तत्त्वावरच अनेक वर्ष कामास ठेवले तर काही वर्षांनी आमची नोकरी जाण्याची भीती आहे, असे जे. जे. रुग्णालयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. नताशा बगेरिया यांनी सांगितले. .................................................... बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय सरकारने प्रश्नावर तोडगा काढला नाही तर बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय संपकरी प्राध्यापकांनी घेतला आहे. तिसऱ्या लाटेची जाणीव डॉक्टरांनाही आहे. आम्ही रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ देत नाही. आंदोलन आणि सेवा दोन्ही बजावत आहोत, असे डॉ. नताशा बगेरिया यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com