मराठी ज्ञानभाषा व्हावी!

मराठी ज्ञानभाषा व्हावी!

मराठी ज्ञानभाषा व्हावी! मराठीतील सर्व वर्गांच्या, सर्व जातींच्या आणि धर्मांच्या लोकांनी विविध साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले पाहिजे. आपले विचार, आपल्या भावना, आपली माहिती मराठीत मांडली पाहिजे, त्यावर चर्चा, वादविवाद झाले पाहिजेत. त्यातूनच खऱ्या अर्थाने भाषिक व्यवहार पुढे जात असतो. इंग्रजी भाषेने जसे विविध शब्द आपल्यात सामावून घेतले, तसे आपल्या भाषेने बोलींमधील शब्द आणि इतर भाषांमधील शब्द आपल्यात सामावून घ्यायला हवेत. त्याच वेळी आपली भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून कोशनिर्मिती आणि त्याचा वापर व्हायला हवा. भाषेतून रोजगार निर्मिती व्हायला हवी. पोटापाण्याचा प्रश्न सुटायला हवा. तो तसा सुटायला लागला म्हणजे मग भाषेविषयी असलेला न्यूनगंड कमी होऊ लागेल. भाषा टिकवायची असेल तर भाषेचे हे अर्थकारण अधिक मजबूत व्हायला पाहिजे. त्यासाठी अर्थातच सरकारी पातळीवरूनसुद्धा प्रयत्न व्हायला पाहिजेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कथा-कादंबरी कवितेमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलींत आणि प्रमाण भाषेत लेखन होते आहे. मात्र माहितीपर आणि विज्ञान शाखांच्या विषयांवर मराठीत व्हायला हवे तेवढे लेखन होत नाही. अशा प्रकारचे लेखन करणारे नवे लेखक पुढे आले पाहिजेत. आपल्याकडे अशा प्रकारचे ज्ञान आणि माहिती ही बहुदा अनुवादित पुस्तकांतून मिळवली जाते. त्याऐवजी जर असे ज्ञान आणि माहिती संशोधन करून आपल्या भाषेतच निर्माण झाली तर ती अधिक उपयोगी ठरेल. त्यातून भाषेचे उपयोजन वाढेल. मराठी माणसाच्या ज्ञानाच्या आणि माहितीच्या गरजा पूर्ण करता येतील. तरुणांनी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अशा इतर विषयांतील माहितीपर लेखनाकडे वळले पाहिजे. भाषा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ते अत्यंत उपयोगी ठरेल. - प्रणव सखदेव, युवा लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेता. (शब्दांकन ः वैभव चाळके)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com