रोहित पक्ष्यांचे खारघर खाडीत आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित पक्ष्यांचे खारघर खाडीत आगमन
रोहित पक्ष्यांचे खारघर खाडीत आगमन

रोहित पक्ष्यांचे खारघर खाडीत आगमन

sakal_logo
By
परदेशी पाहुण्याची ''संक्रांत भेट'' खारघर खाडीत रोहित पक्ष्यांचे आगमन खारघर, ता. १५ (बातमीदार) : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले परदेशी पाहुणे; अर्थात ''फ्लेमिंगो'' उर्फ रोहित पक्ष्यांचे खारघरच्या खाडीत आगमन झाले आहे. या भागात पक्षी पुन्हा परतून आल्याने निसर्गाकडून ''संक्रांत भेट'' मिळाल्याचा आनंद पक्षीप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. रोहित पक्ष्यांमुळे पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींनी पुन्हा एकदा खाडीकिनारी फेरफटका मारण्यास सुरुवात केली आहे. थंडीची चाहूल लागली की, ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत हे पक्षी नवी मुंबईच्या पाणथळ जागी दाखल होत असतात. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. मात्र, या वर्षी हवामानात बराच बदल झाला आहे. याशिवाय, सध्या मुंबई, नवी मुंबईत काही दिवसांपासून गारवा जाणवत आहे. या गारव्यामुळे शनिवारी (ता. १५) खारघर सेक्टर १६, १७ खाडीकिनाऱ्यावरील पाणथळ जागेत रोहित पक्ष्याचे आगमन झाले. ही माहिती मिळताच पर्यावरण तज्‍ज्ञ आणि पक्षीप्रेमी सारंग तरण, नरेश सिंग आणि ज्योती नाडकर्णी या तिघांनी खाडी किनारा गाठून रोहित पक्ष्याचे निरीक्षण केले. ज्योती नाडकर्णी म्हणाल्या, नुकतेच रोहित पक्ष्याचे आगमन झाले आहे. त्यांचे प्रमाण कमी असून येत्या आठवड्याभरात त्यात वाढ होवू शकते. काही नागरिकांनीही खाडीकिनारा गाठून रोहित पक्षी बघण्याचा आनंद लुटला. एक हजार दिवसांनी परतले फ्लेमिंगो खारघर परिसरातील कांदळवनांतील खाडीकिनारी तब्बल एक हजार दिवसांनी फ्लेमिंगो परतल्याने खारघरची जैवविविधता पुन्हा एकदा समृद्ध झाल्याचे मत पर्यावरणवादी संघटनांनी व्यक्त केले आहे. पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींनी पुन्हा एकदा खाडीकिनारी फेरफटका मारण्यास सुरुवात केली आहे. निसर्गाचा समतोल राखायचा असल्यास दलदली भाग, कांदळवने आणि पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन केले पाहिजे, हा मुद्दा यानिमित्ताने अधोरेखित झाला, असे नेटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले. खारघर परिसरातील कांदळवने आणि दलदलीला नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची तक्रार सरकार आणि उच्च न्यायालय नियुक्त कांदळवन समितीकडे या अगोदर केली आहे. कांदळवन परिसंस्था केवळ सागरी वनांचे रक्षण करत नाही, तर विरळ कांदळवने, भरतीच्या प्रवाहावर वाढणारी हरीत वने, जलमार्ग यांसारख्या घटकांना सामावून घेतात. या सगळ्याचा संपूर्ण परिसंस्थेवर परिणाम होत असतो. - नंदकुमार पवार, श्री एकविरा आई प्रतिष्ठान ---------------------------------------- कांदळवनांचा ऱ्हास वेळीच थांबवा कांदळवने लवकरात लवकर वन विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. परंतु, दिरंगाई झाल्यास कांदळवनांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. अशा प्रकारे जर कांदळवनांचा होणारा ऱ्हास वेळीच थांबवला नाही, तर त्याचा विपरीत परिणाम खारघर, कळंबोली, कामोठेसारख्या शहरांवर दिसेल, असे निरीक्षण नेटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी नोंदवले. ------------------------------------------- कांदळवनांसाठी सरकार दरबारी साकडे खारघर येथील किमान दोन किलोमीटर खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांदळवनांचा नाश आणि जमीन घशात घालण्याचे सत्र सुरू आहे. पर्यावरणवाद्यांनी त्या संबंधीची तक्रार राज्य सरकार आणि उच्च न्यायालय नियुक्त कांदळवन समितीकडे केली आहे. कांदळवनांत टाकलेला मातीचा भराव आता सपाट करण्यात आला आहे. तसेच या परिसरात बेकायदेशिररीत्या कोळंबी पालन केले जात असल्याचे मत नेटकनेक्ट फाऊंडेशन आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. नवी मुंबईतील खारघर क्षेत्रात कांदळवनांचा “प्रचंड” नाश आणि भराव होत असल्याची तक्रार हरितप्रेमींनी राज्य सरकारकडे केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन सचिवांना तातडीने याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिल्याची माहिती बी. एन. कुमार यांनी दिली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top