Thur, May 19, 2022

डोंबिवलीत माकडांचा उच्छाद
डोंबिवलीत माकडांचा उच्छाद
Published on : 31 January 2022, 11:54 am
डोंबिवलीतील आयरे गावात माकडाचा वावर
अन्नपदार्थ न टाकण्याचे जागरूक नागरिकांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ ः डोंबिवली एमआयडीसी निवासी भाग, पलावानंतर आता आयरे गाव परिसरातदेखील माकडांचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. येथील सोसायट्यांच्या गच्चीवर ही माकडे वास्तव्य करीत आहेत. दिवसभर सोसायटीतील कचऱ्यात पडलेले खाद्य किंवा नागरिकांच्या घरातील किचनच्या खिडकीत जाऊन खाद्य मागण्याकडे त्यांची मजल गेली आहे. नागरिकांकडून या माकडांच्या अन्न, पाण्याची व्यवस्था केली जात असल्याने या माकडांचा मुक्काम मानवी वस्तीत लांबत आहे.
काही दिवस हौस-मजा म्हणून नागरिक माकडांना खायला देतील; मात्र नंतर खायला मिळाले नाही की माकडे, वानर खाद्याच्या शोधात घरात शिरून हैदोस घालतील, अशी भीती जागरूक नागरिकांकडून, प्राणीमित्रांकडून व्यक्त केली जात आहे. पलावा सिटीमध्ये अशाच पद्धतीने एका माकडाने आपल्या मर्कटलीलांनी नागरिकांना हैराण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वीच घडली होती. सध्या डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील बालाजी गार्डन या सोसायटीमध्ये एका माकडाचा गेल्या चार-पाच दिवसांपासून वावर असल्याचे दिसून येत आहे. या सोसायट्यांसोबतच आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये जाऊन हे माकड आपली भूक भागवत आहे. त्याने अद्यापपर्यंत कोणालाही इजा केली नसली, तरी भविष्यात लहान मुलांना, नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून येथील जागरूक नागरिकांनी माकडास खाद्यपदार्थ देणाऱ्या नागरिकांना त्यास खाद्य न देण्याची विनंती केली आहे.
माकडाचा खेळ करणारे मदारी अनेकदा माकडे म्हातारी झाल्यानंतर त्याचा सांभाळ न करता त्यांना असेच सोडून देतात. मानवी वस्तीत प्राण्यांना सोडून देण्याऐवजी प्राणीमित्रांशी संपर्क साधून त्यांना जंगलात सोडण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. तसेच शहरी भागात वन्यप्राण्यांचा वावर का वाढत आहे, याचाही अभ्यास होणे गरजेचे झाले आहे.
- सुशांत पाटील, प्राणीमित्र
Web Title: Todays Latest Marathi News
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..