दगडखाणींच्या धुरळ्याने नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दगडखाणींच्या धुरळ्याने नागरिक त्रस्त
दगडखाणींच्या धुरळ्याने नागरिक त्रस्त

दगडखाणींच्या धुरळ्याने नागरिक त्रस्त

sakal_logo
By

महेश भोईर : सकाळ वृत्तसेवा
उरण, ता. २३ : उरण-पनवेल तालुक्याच्या सीमेवर जासई-वहाळ येथे दगडखाणी आणि स्टोन क्रशरच्या धुरळ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महसूल विभागाच्या आशीर्वादाने सरकारचे नियम धाब्यावर बसवून दिवस रात्र या भागात क्रशर आणि बेसुमार दगडांचे उत्खनन सुरू आहे. यामुळे उडणाऱ्या धुरळ्याने वहाळ-उलवे नोड आणि जासई परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. या परिसरातच ३०-३५ दगडखाणी आणि २०-२२ क्रशर आहेत. या सर्व दगडखाणी आणि क्रशर हे राजकीय बड्या धेंडाच्या आणि उद्योजकांच्या मालकीचे असल्यामुळे या माफियांची प्रचंड मुजोरी आहे. त्यामुळे ते कोणालाही जुमानत नाहीत.
खाणपट्टा संपल्यानंतरही त्या खाणपट्ट्यातून कोट्यवधी रुपयांचे गौण खनिजाचे उत्खनन करून पर्यावरणाचे प्रचंड नुकसान दगडमाफियांकडून केले जात आहे. या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि वहाळ ग्रामपंचायतीने पर्यावरण विभाग आणि महसूल विभागाकडे तक्रारी दिल्या असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. जासई-वहाळ परिसरात अनेक क्रशर आणि दगडखाणी अनधिकृत असून, त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसल्याचे पुढे आले आहे. या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात नियमबाह्य दगडांचे उत्खनन करण्यात आले असून येथे प्रचंड आकाराचे सरोवर तयार झाले आहे. संपूर्ण उरण तालुक्याला या दगडखाणीत असलेले पाणी पुरेल एवढे या कृत्रिम सरोवरात आहे. दगडांचे किती खोलीपर्यंत उत्खनन करावे, यासाठी सरकारने नियम घालून दिले असताना ते सर्रास पायदळी तुडवले जात आहेत.
दिवसरात्र या भागातून धुळीचे लोट उडत असतात. रात्रीच्या सुमारास तर या परिसरात प्रचंड धुळीचे लोट तयार होतात. कधी कधी तर समोरचा माणूस दिसत नाही, असे वहाळ ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात प्रचंड वायुप्रदूषण होत असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या परिसरात उघड्यावर काम करणाऱ्या
कामगारांच्या तर रोज मुठभर तरी धुरळा पोटात जात असण्याची शक्यता आहे.

---------------------------------
जासई-वहाळ परिसरात असलेल्या क्रशर आणि दगडखाणीतून उडणाऱ्या धुळीमुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने याबाबत अनेक वेळा महसूल विभाग, सिडको आणि एमपीसीबीकडे तक्रारी दिल्या; मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. प्रशासनाने या दगडखाणींतून होणाऱ्या प्रदूषणाची तातडीने दखल घ्यावी.
- पूजा पाटील, सरपंच, वहाळ ग्रामपंचायत

----------------------------------
या दगडखाणींचा जासईच्या ग्रामस्थांनाही त्रास होतो. बडे धेंड असलेल्या या दगडखाण आणि क्रशरच्या अनेकांनी या खाणींची ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही.
अनेक खाणमालक तर ग्रामपंचायतीला करदेखिल देत नाहीत.
- संतोष घरत, सरपंच, जासई ग्रामपंचायत

----------------------------------
आम्ही सर्व दगडखाण आणि क्रशरचालकांना प्रदूषण होणार नाही, याबाबत काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच धुरळा उडू नये यासाठी सतत पाण्याची फवारणी
केली जाते.
- सुनील भोईर, अध्यक्ष, श्री कान्होबा दगडखाण आणि क्रशर चालक-मालक संघ

----------------------------------
प्रदूषण पसरवणाऱ्या आणि सरकारचे नियम न पाळणाऱ्या दगडखाणींवर आणि क्रशरवर कारवाई केली जाईल. तसेच याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाई करण्याबाबतचे तातडीने पत्र देण्यात येईल.
- राहुल मुंडके, उपविभागीय अधिकारी, पनवेल

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top