
लोकशाही तोलण्यासाठी संवाद महत्त्वाचा!
मुंबई, ता. २४ ः लोकशाही तोलण्यासाठी एकमेकांमधील संवाद फार महत्त्वाचा आहे. या संवादाचा संस्कार करण्याचा प्रयत्न ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या अधिवेशनामागे आहे. इतरांना त्रास होऊ नये व इतरांच्या भल्यात आपले भले आहे, एवढे समजून घेणारा समाज तयार होण्याची भूमिका यावी हाच हेतू आहे, असे मत ‘सकाळ’ माध्यमसमूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.
‘यिन’च्या अधिवेशनामागील उद्देश सांगताना पवार म्हणाले की, ज्या संसदीय प्रथांवर आपली लोकशाही तोलली गेली आहे त्यांची ओळख व्हावी; तसेच विविध कलागुणांचा समुच्चय तरुणांच्या अंगी यावा, यासाठी हा प्रयत्न आहे. महाविद्यालयीन शिक्षणाव्यतिरिक्त व्यक्तिमत्त्वविकासाची अनेक अंगे आहेत. हे शिक्षण तसेच बाहेरील जग यांची सांगड घालण्याचे जीवनशिक्षण ‘यिन’मधून देण्याचा प्रयत्न होतो. निरनिराळ्या क्षेत्रांत नेतृत्व तयार करणे, त्याला समाजाशी जोडलेले ठेवणे, यासाठी जागेपणाने विचार करण्याची गरज आहे. आपण नैसर्गिक गोष्टींशी जोडले जाऊया व अनैसर्गिक गोष्टी टाळूया, हे ‘यिन’ आणि ‘सकाळ’चे सूत्र आहे.
मतदारांचे भले करण्याची जबाबदारीही तुमच्यावर!
शासकीय पातळीवरील महाविद्यालयीन निवडणुका बंद पडल्यावर ‘यिन’तर्फे निकोप स्पर्धेसाठी राजकीय रंग बाजूला ठेवून त्या पुन्हा सुरू केल्या. मुलांकडून मते मिळविण्यासाठी त्यांना आपले म्हणणे पटवून देणे, ही मोठी शक्ती आहे. त्यातून तुम्ही निवडून आल्याने तुमची किमान नेतृत्वक्षमता सिद्ध झाली व मतदारांचे भले करण्याची जबाबदारीही तुमच्यावर आली. फक्त निवडणुकीपुरते एकत्र न येता, कायदे तयार करणे या संसद-विधिमंडळाच्या मुख्य कामाचे व गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण मिळावे हा अशा कार्यशाळांचा उद्देश आहे, असे श्रीराम पवार यांनी सांगितले.
‘यिन’चे व्यासपीठ समाजोपयोगी
आपले म्हणणे ठामपणे दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करणे; पण तरीही मतभेद झाल्यास आपले म्हणणे कायम ठेवून (अॅग्री टू डिसअॅग्री) बहुमताचा आदर करणे, हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आत्मसात करण्याचा हा छोटा प्रयोग आहे. या अधिवेशनातील सर्व वक्त्यांकडून तुमचे नेतृत्व विकसित होईल, अशा गोष्टी शिकून घ्या. समाजाला विविध प्रकारे मदत करणारे ‘यिन’ हे व्यासपीठ आहे. समाजात जगण्याचे भान यावे, ही प्रेरणा तुमच्यात यावी, यासाठी हा उपक्रम आहे, असे श्रीराम पवार म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..