Abhijit Pawar
Abhijit PawarSakal

व्यवस्थेत बदल हवाय तर मानसिकता बदला : अभिजित पवार

‘यिन’ मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात अभिजित पवार यांचा तरुणांना सल्ला

मुंबई : आपल्याला बदल हवा असेल तर त्यासाठी मानसिकता बदलावी. त्यासाठी अस्सल (ओरिजिनल) भारतीय विचार महत्त्वाचा आहे. आपण आज अस्सल विचार करायचे सोडल्याने देशाची दयनीय अवस्था झाली आहे. सध्या आपण जगाला ओरिजिनल असे काहीच दिले नाही. भारतीय परंपरेत जगाने घ्याव्यात, अशा अनेक गोष्टींचे अस्सल ज्ञानभांडार आहे, याचा विचार करावा. आपण केवळ इतरांच्या विचारांची गुलामी करू नये. त्यामुळे राजकारण बदलायचे असेल तर देश कसा चालवायचा, याची प्रेरणाही आपणाला आपल्या परंपरेतून घेता येईल, असे प्रतिपादन ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि ए. पी. जी. ग्लोबलचे अध्यक्ष अभिजित पवार यांनी ‘यिन’च्या तरुणांना केले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू असलेल्या ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनात अभिजित पवार यांनी शुक्रवारी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मूलतत्त्वे या विषयावर तरुणांशी संवाद साधला. त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. आपण बदल होत नाही ही तक्रार करतो; परंतु त्याची सुरुवात आपल्यापासून कशी करावी, त्यासाठी काय करावे आणि काय करू नये, हे सांगताना पवार यांनी भारतीय अस्सल विचारच कसे महत्त्वाचे आहेत, यावर भर दिला.

आज आपल्याकडे बदल होत नाहीत, ही तक्रार असते. मात्र, बदल आणण्यासाठी संस्था नाही तर मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आज आपल्याकडे नेते, प्रशासन यंत्रणा बदलली नाही. न्याययंत्रणेत लाखो खटले प्रलंबित आहेत. देश कसा चालवायचा हे आपण आपल्या बुद्धीने ठरवावे. जगातील कोणत्या देशातील लोकशाहीचे मॉडेल चांगल्या प्रशासनासाठी उत्तम आहे, हे तपासून पाहा. ब्रिटिशांनी त्यांची सेवा करण्यासाठी शिक्षणपद्धती आणली. आजही आपली मुले अमेरिकेत सेवेसाठी जातात.

त्याऐवजी त्यांनी तेथे शिकून भारत देश बदलायचा प्रयत्न करावा. काहीतरी वेगळा विचार आणावा. आम्ही नवे रचनात्मक विचार करायचे सोडल्याने देशाची आज ही स्थिती आली आहे. स्टार्टअप समाजाच्या समस्या सोडविण्याचा विचार करतात व त्याभोवतीच आपला व्यवसाय वाढवतात. असे केल्याने आपल्याला ग्रामीण भागातील समस्यांचे उत्तर शोधणारे अनेक व्यवसाय उभे करता येतील. त्या संकल्पनांना निधी व अन्य गोष्टींची कमतरता होणार नाही. आज आपण जगाला गुगल, फेसबुक वा टिकटॉकसारखे ओरिजिनल, अस्सल असे काहीही दिले नाही. त्यामुळे यंत्रणा-सिस्टीम बदलण्यासाठी काय केले पाहिजे, असा नवा ओरिजिनल विचार करा. नवीन मॉडेलसाठी, बदल होण्यासाठी रचनात्मक नवे अस्सल विचार तरुणांनी करावेत, असे पवार यांनी सांगितले.

आपल्याकडे ज्ञानभांडार होते, ते सोडून आपण गुलामी करतो, ही मानसिकता बदला. राजकारणात मेरिट आहे का, याचा विचार करा. ज्यांना मते देतो त्यांच्याकडे मेरिट आहे का, याचा विचार करा. फक्त बहुमत हे लोकशाहीचे मॉडेल नाही, याचा विचार तरुणांनी एकत्र येऊन करावा. सर्वांच्या भल्यासाठी संघर्ष करा व त्यानुसार बदल करा, असा सल्लाही पवार यांनी दिला.

जीवनात आनंद, समाधान मिळविण्यासाठी चांगले जीवन कसे जगावे, निःस्वार्थी विचार कसा करावा, याचेही सल्ले पवार यांनी दिले. माणूस हा शेवटपर्यंत मागतच राहतो; पण मी काय देणार, हे कोणी सांगत नाही. आपला जन्म देण्यासाठी झाला की घेण्यासाठी, याचा विचार करावा. आपली वृत्ती समाधानी हवी, याचा अर्थ काहीही करूच नये, असे नाही. मात्र, इतरांचाही विचार करावा, असेही ते म्हणाले. केवळ पैशाने समाधान व आनंद मिळत नाही. कितीही कमी वा जास्त उत्पन्न असले तरीही लोक असमाधानी व असुरक्षित असतात. म्हणून केवळ पैशात समाधान शोधता येत नाही. त्यापलीकडे समाधान शोधण्यासाठी समाजाच्या भल्याचा विचार करावा लागतो. तो करण्याची शिकवण व त्याची कार्यपद्धतीही भारतीय परंपरेत आहे. ती मुलांनी आत्मसात करावी. त्याने भौतिक उन्नती करताना आत्मिक समाधानही लाभेल, असे पवार म्हणाले.

यशाची पहिली पायरी
व्यवसाय करताना नुकसान झाले तरी हात-पाय गाळू नका. व्यवसायात पहिल्याच फटक्यात यश मिळवणे कठीण असते. उलट अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे तत्त्व परदेशातही मानले जाते. जसे आपण पहिल्यांदा सायकल चालवताना पडतो, तेव्हा फार लागत नाही. त्या वेळी पडलो नाही आणि मोठेपणी मोटरसायकल चालवताना पडलो तर जास्त नुकसान होईल. तसेच परदेशात व्यवसायात सुरुवातीला चार-पाच वेळा अपयश आले तर आनंद व्यक्त करतात. मात्र, आपल्याकडे लहानपणापासून पटकन यश मिळविण्याच्या पुष्कळ अपेक्षा ठेवल्या जातात व अपयश आले तर टीका होते. मी सरळ मार्गाने चालतो म्हणून व्यवसायात तोटा होतो, अशी रडकी वृत्ती तयार होते. पण स्वतःला मोठे करायचे असेल तर अपयश आले तरीही जिद्दीने पुढे या, असे विचार अभिजित पवार यांनी मांडले.

समाधान कसे मिळवावे?
सध्या कोणीच आपल्या कामात-वेतनात सुखी नसते, असे आढळून येते. पण कामातील आनंद हा पगारावर अवलंबून नसतो. समाधानी वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि आतून आनंद मिळवण्यासाठी काय करायचे, याचा विचार करावा. समाधान मिळवण्याच्या जवळ जाण्यासाठी सेवा हे सर्वोत्तम साधन आहे. भारतीय परंपरांमधील ज्ञान हे परमानंद देणारे असे अविश्वसनीय आहे. सुख हवे असेल तर याशिवाय दुसरा मार्ग नाही, असेही अभिजित पवार म्हणाले.

आनंदी जीवनासाठी हे कराच
आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे व काय करू नये याबाबतही अभिजित पवार यांनी मार्गदर्शन केले. यातील निदान काही विचार प्रत्यक्षात आणा व त्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे या, असेही ते म्हणाले. सकाळी उठल्यावर सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा. आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेचा विचार करावा, बुद्धीची-ज्ञानाची उपासना करावी, घरात दीपज्योत लावताना आपल्या अंतर्मनातही सकारात्मक ऊर्जेची प्रकाशज्योत उजळावी हा प्रयत्न असावा. त्याने वातावरण बदलेल. सकाळी थोडा व्यायाम करा. आपले शरीर लवचिक राहावे यासाठी साधी-सोपी योगासने करा, सूर्यनमस्कार घाला, हलके खा, इतरांबद्दल चांगले विचार करा... कोणी आपल्याला त्रास दिला तरी त्याला सोडून द्या, आपल्या घरी चौरस सात्विक आहार अशी चांगल्या वातावरणाची दिवाळी साजरी करा, जेवल्यावर दहा मिनिटे मन प्रफुल्लित करणारे शांत संगीत ऐका, निःस्वार्थी व्यक्तीलाच यश मिळते हे ध्यानी ठेवून रोज काहीतरी चांगले काम हटकून करा व ते डायरीत रोज नोंदवूनही ठेवा, रोज साऱ्या विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा, रोज किमान सहा-सात तास झोपा, कोणतेही चुकीचे अवैध काम करू नका, सात्विक जेवण घ्या, आपण जे धान्य खातो त्याच्या भरपाईसाठी किमान एक चांगले झाड लावा आणि त्याची आयुष्यभर काळजी घ्या, रोज काहीतरी प्रत्यक्ष काम करा, आपला अहंकार कमी व्हावा यासाठी एक खोली स्वच्छ करण्याचे व्रत करा, गरजू व्यक्तीबद्दल फक्त सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्याला प्रत्यक्ष मदत करा, अन्न-वस्त्र-ज्ञान याचे दान करा आणि कोणाकडेही काहीही मागणे बंद करा, असेही त्यांनी सांगितले.

सदसद्विवेकबुद्धीला महत्त्व द्या
केवळ आसक्तीपूर्ण जीवन असू नये. भौतिक गोष्टींविषयीच्या आसक्तीतच कायम अडकू नये. एखाद्या गोष्टीचे श्रेय घेणे सोडावे. मी किंवा तुम्ही असे वेगवेगळे मानणे सोडा. आपपरभाव-भेदभाव सोडा. देवाचे कार्य ते माझे कार्य असे समजून त्यात मी आला तर तो अहंकार सोडावा. सदसद्विवेकबुद्धीचे अहंकाराशी कायम युद्ध सुरू असते. त्यात आपण सदसद्विवेकबुद्धीला महत्त्व द्यावे, असे अभिजित पवार म्हणाले.

अडथळा हा टेकऑफ व्हावा
आयुष्यात अडथळे पुष्कळ आले. पूर्वी त्याचे दुःख होत असे. मात्र, आता देव आपली परीक्षा घेतो हे जाणवून मजा येते. आपले काय चुकते हे कळते व काय करावे याचीही जाणीव होते. अडथळ्यांना अडथळा असे समजू नका, तर टेकऑफ पॉईंट म्हणून बघा. अडथळा आला की त्याच्या साह्याने मोठी उडी घ्यायची हे लक्षात ठेवा, असा सल्ला अभिजित पवार यांनी दिला.

ग्रामीण उद्योजकता व टॅलेंट
ग्रामीण तरुणांमधून उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी तुम्ही सर्व तरुणांनी एकत्र आले पाहिजे. व्यवसाय करताना मोठ्या समस्या सोडविण्याचे ध्येय ठेवा व शेतकऱ्याचे कल्याण हा हेतू ठेवा. शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा, असे सर्व तरुणांनी ठरवले तर शेतमालाला बाजारपेठ मिळेल व त्यासाठी भांडवलही मिळेल. असे ‘अॅप’ तुम्ही सहज तयार करू शकता. म्हणजेच यासाठी भांडवल नव्हे तर नवकल्पना महत्त्वाची आहे, असेही अभिजित पवार यांनी दाखवून दिले. अशाच प्रकारे कच्चा बादाम हे गाणे गाणारी सामान्य व्यक्ती पश्चिम बंगालमधील आहे. ती जर प्रसिद्ध झाली तर महाराष्ट्रातील ग्रामीण गुणी कलाकारांना काहीही कठीण नाही. आपल्याकडेही इंटरनेट असल्याने फक्त दृढनिश्चय करून प्रयत्न केले तर चांगली कला आपोआप व्हायरल होईल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com