युक्रेनमधून २१९ विद्यार्थी मुंबईत दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युक्रेनमधून २१९ विद्यार्थी मुंबईत दाखल
युक्रेनमधून २१९ विद्यार्थी मुंबईत दाखल

युक्रेनमधून २१९ विद्यार्थी मुंबईत दाखल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले हजारो विद्यार्थी युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शनिवारी २१९ विद्यार्थी मुंबईत परतले. किव्ह शहरातून १२०० किमी अंतरावरील बुखारेस्ट व युक्रेनची राजधानी किव्हसह अन्य शहरांत अडकून पडलेले हे विद्यार्थी जवळपास १२०० किलोमीटर प्रवास करून रोमानियाच्या सीमेवर पोहोचले. बुखारेस्ट विमानतळावरून या विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे ‘एआय-१९४४’ हे विशेष विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर ७.३० वाजता उतरले आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय वाणीज्य मंत्री पियूष गोयल, परिवहन मंत्री अनिल परब आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. विमानतळावर उपस्थित काही कार्यकर्त्यांच्या हातात पक्षाचे झेंडेही दिसत होते. महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या विद्यार्थ्यांसाठी खाद्यपदार्थ, पाणी, निवासाची सोयसुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी विमानात शिरून विद्यार्थ्यांना संबोधित करून त्यांचे स्वागत केले.
...
हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये
रशियाचे सैन्य राजधानी किव्ह, खारकीव्हसह अनेक शहरांत शिरले असून, तिथे आता युक्रेनीयन आणि रशियन लष्करामध्ये निकराची ल़ढाई सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत युद्धाची तीव्रता वाढणार असून, त्यामुळे या शहरात बंकरमध्ये सुरक्षित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर पडणे कठीण आहे. युक्रेनमधील अनेक विमानतळ रशियाच्या ताब्यात गेलेत किंवा ते युक्रेनच्या लष्कराकडून संचलित होत आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मायदेशात परतणे कठीण असल्याचे सांगितले.
....
गुरुवारपासून युद्ध सुरू झाले. त्या दिवसापासून युक्रेनमध्ये फसलेल्या सर्व नागरिक, विद्यार्थी सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित देशांशी संपर्कात होते, त्यांची बोलणी सुरू होती. आज हे सर्व विद्यार्थी सुरक्षित परत आले, या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधानांनी मला पाठवले.
- पियूष गोयल, केंद्रीय मंत्री.
....
भारतीय दूतावासाचे अधिकारी आमच्याशी सातत्याने संपर्कात होते. युद्ध सुरू झाल्यामुळे बंकरमध्ये आम्हाला दिवस काढावे लागले. इथून बाहेर पडण्यासाठी युक्रेनीयन सरकारने खूप सहकार्य केले. हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून आम्ही रोमानियाच्या सिमेत आलो, त्यावेळी आम्हाला हायसे वाटले. आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत.
- सुटका झालेले विद्यार्थी

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top