ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गास विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गास विरोध
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गास विरोध

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गास विरोध

sakal_logo
By

भिवंडी, ता. १ (बातमीदार) ः ठाणे-भिवंडी - कल्याण या मेट्रो प्रकल्प पाचची सुरुवातीपासून सुरू झालेले अडथळ्यांची शुक्लकाष्ठ संपताना काही दिसत नाही. त्यामुळे ठाणे ते धामणकर नाका येथपर्यंत पोहचलेले मेट्रोचे काम पुढे सरकले नाही. प्रस्तावित मेट्रोचा कल्याणकडील प्रवास कल्याण नाका-टेमघर-राजनोळी मार्गे होण्याचे निश्चित झाला आहे. या मार्गावर पुन्हा मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणावर रस्तारुंदीकरण करण्याची गरज असून त्यास येथील व्यापारी, निवासी या सर्वांचाच विरोध आहे. कल्याण रस्ता व्यापारी रहिवासी संघर्ष समितीने विशेष बैठक घेऊन या मेट्रो प्रकल्प मार्गास विरोध करीत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.
ठाणे बाळकूम भिवंडी-कल्याण नाकामार्गे कल्याण या २४.९० किमी लांबीच्या मार्गासाठी ८४१६.१५ कोटी रुपये खर्च केले जाणार असून या मार्गाचा भूमिपूजन १८ ऑक्टोबर २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते; परंतु भिवंडी शहरातील कल्याण नाका ते टेमघर राजनोली या नियोजित मार्गास सुरुवातीपासून कल्याण रस्ता ते टेमघरदरम्यान विस्थापित होणाऱ्यांनी विरोध केल्याने हा प्रकल्प रखडण्यास सुरुवात झाली. ती आजपर्यंत कायम आहे. नियोजित भिवंडी शहरातील मार्ग अंजुरफाटा धामणकर नाका, कल्याण नाका येथून राजनोली नाकामार्गे कल्याणच्या दिशेने जाणार होती; परंतु त्याचदरम्यान कल्याण नाका ते राजनोली नाकादरम्यान एमएमआरडीएने उड्डाणपूल बनविल्याने या मार्गावर पुन्हा मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणावर रस्तारुंदीकरण करण्याची गरज आहे. दरम्यान, या प्रस्तावित मार्गात तब्बल ८०० व्यापारी व रहिवासी मालमत्ता बाधित होत असून ५ मंदिरे,२ मस्जिद, दर्गा बाधित होणार आहे.

पोलिस सतर्क
आगामी महापालिकेच्या निवडणूक लक्षात घेऊन या आंदोलनाला काही राजकीय पक्षांचे कामचलाऊ पुढारी भडकावू हवा देत असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई पोलिस करतील, असा इशारा भिवंडी पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिला आहे.