सायन पनवेल महामार्ग अंधारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायन पनवेल महामार्ग अंधारात
सायन पनवेल महामार्ग अंधारात

सायन पनवेल महामार्ग अंधारात

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २८ (वार्ताहर) : मुंबईकडे जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. सरकारच्या आदेशानुसार हे पथदिवे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पनवेल महापालिकेने हस्तांतरित करून घ्यावेत, याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. परंतु, याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने महामार्गावर अंधाराचे जाळे पसरले आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
''बांधा वापरा आणि हस्तांतरित करा'' या तत्त्वावर सायन-पनवेल महामार्गाचे पाच वर्षांपूर्वी रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यात आले. कळंबोली ते बीआरसी जंक्शन यादरम्यान हा महामार्ग आहे. पनवेल टोल वेज कंपनीला हे काम देण्यात आले होते. १२०० कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग बांधण्यात आला. त्यावर पथदिव्यांचीही सोय करण्यात आली. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा महामार्ग प्रकाशमय झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारने लहान वाहनांना पथकरांमधून सूट दिली होती. त्यामध्ये खारघर टोलनाक्याचाही समावेश आहे. या बदल्यात होणारे नुकसान राज्य सरकारने देणे अपेक्षित होते; परंतु ती रक्कम न मिळाल्याने संबंधित कंपनीने टोलवसुलीचे काम सोडून दिले. त्यानंतर इतर एजन्सी या ठिकाणी नियुक्त करण्यात आली.
निधीअभावी महामार्गावरील पथदिवे त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा देखभाल दुरूस्त करून ती चालू ठेवणे सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरापास्त झाले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावेत, अशा प्रकारचे आदेश सरकारकडून निर्गमित करण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबईबरोबरच पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार करून हे पथदिवे वर्ग करण्याचे सूचित केले आहे.
भारती विद्यापीठ ते कळंबोली जंक्शन यादरम्यानचे पथदिवे देखभालीसाठी पनवेल महापालिकेने हस्तांतरित करून घेण्याबाबत अडीच वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पत्रव्यवहार केला जात आहे. परंतु, त्याला महापालिका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या महामार्गावरील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार पसरत आहे.

कोट
सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. त्याची दुरुस्ती आणि देखभाल केली जात नाही. त्यामुळे मोठमोठे दिवे धूळ खात पडून आहेत. रात्रीच्या वेळी अंधारात प्रवासी आणि वाहनचालकांना त्रास होतो. यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळते. बस किंवा इतर वाहनांतून उतरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्याचे प्रकारही घडतात. या सर्व पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पनवेल महापालिकेने समन्वय साधून सर्व पथदिवे कार्यान्वित करावेत, अशी आमची न्याय मागणी आहेत
- प्रशांत रणवरे, कार्यकर्ता,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस