
राज्याच्या पर्यटन क्षेत्रात तीस ठिकाणी पीपीपी मॉडेल
मुंबई, ता. ६ ः तीस नव्या पर्यटनस्थळांवर पीपीपी मॉडेल राबवण्याचा सरकार विचार करीत असल्याची माहिती पर्यटन व नागरी वाहतूक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी दिली आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष जुझार खोराकीवाला यांच्या हस्ते नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
या वेळी चेंबरचे उपाध्यक्ष अनंत सिंघानिया हजर होते. पर्यटन क्षेत्रात पीपीपी मॉडेल राबविण्याबाबत सरकारचा विचार सुरू असून यासाठी तीस नवी पर्यटनस्थळे निश्चित करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. पर्यटन-आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्याने त्यांना पाणीपट्टी आणि मालमत्ता करात सवलत यासह अनेक फायदे मिळतील; तर या क्षेत्राला वीजबिलातही सवलत देण्यासंदर्भात सरकारचा विचार सुरू असल्याचेही वल्सा नायर सिंह म्हणाल्या. नवे हॉटेल-रेस्टारंट उघडण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या सरकारने ७२ वरून फक्त नऊपर्यंत कमी केली आहे. तसेच त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियादेखील ऑनलाईन केली आहे. या नव्या बदलांचा फायदा या क्षेत्राला होईल. पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधांची उभारणी, कौशल्य प्रशिक्षण, धोरणात्मक बदल, तसेच नियोजन यासंदर्भात होत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली.
आयएमसीच्या पर्यटन व आदरातिथ्य समितीचे अध्यक्ष फरहात जमाल, थॉमस कुक इंडियाचे माजी एमडी अश्विनी कक्कर, फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टारंट असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष गुरुबक्षिशसिंह कोहली यांनीही या वेळी आपले विचार मांडले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..