मुंबईतील महारुग्णालय प्रकल्प गुंडाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील महारुग्णालय प्रकल्प गुंडाळला
मुंबईतील महारुग्णालय प्रकल्प गुंडाळला

मुंबईतील महारुग्णालय प्रकल्प गुंडाळला

मुंबई : महामुंबईसाठी पाच हजार खाटांचे साथरोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी मुंबई महापालिकेने मध्यवर्ती असणाऱ्या तीन जागाही निवडल्या होत्या. गेल्या दीड वर्षात रुग्णालय उभारण्यासंदर्भात काहीही प्रयत्न झाले नसून, आता तर हा प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेची झालेली फरपट पाहिल्यानंतरही प्रशासन अद्याप झोपेतून जागे झाले नसल्याची टीका होऊ लागली आहे.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेमध्ये आरोग्य व्यवस्था आणि रुग्णालयांवर आलेला ताण लक्षात घेऊन मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी मोठे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी राज्य सरकारने पालिकेला जागा शोधून हे रुग्णालय उभारण्यास सांगितले होते. या महारुग्णालयासाठी साधारणतः २० एकर भूखंडाची आवश्यकता होती. त्यासाठी पालिकेने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील मध्यवर्ती ठिकाणी जागेची शोधाशोध सुरू केली होती.
काही जागा निश्चित केल्यानंतर पालिकेने जमीनमालकांकडून अर्ज मागवले होते. जमीन घेण्यासाठी अर्ज मागविताना एकत्रित २० एकर जमीन खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. या जमिनीचे गरजेनुसार हस्तांतर करण्यात येईल, असेही पालिकेने स्पष्ट केले होते. मुंबईची जकात व्यवस्था बंद झाल्याने या जमिनींचा वापर करण्याची चाचपणीदेखील करण्यात आली.

मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील जकात नाक्यांची ११८ एकरच्या आसपास जमीन उपलब्ध आहे. या जागेचा वापर रुग्णालयासाठी करण्याचा विचारही केला गेला. या जमिनींचा वापर केल्यास रुग्णालय ऐसपैस बांधता येईल, वाहतूक कोंडीची समस्या राहणार नाही. शिवाय मुंबईलगतच्या शहरांमधील नागरिकांनाही सोयीस्कर पडेल, असा विचार करण्यात आला होता. या रुग्णांलयात महामुंबईतील रुग्णांसाठी जागा राखीव ठेवण्यात येणार होते. साथरोग नसताना इतर नियमित आजारांसाठी हे रुग्णालय वापरण्याचे नियोजन होते. मात्र, प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याने या नियोजनावर पाणी फेरले आहे.

अंतिम निर्णयच नाही
प्रस्तावित रुग्णालयासाठी भूखंड निवडण्याची प्रक्रिया पालिका सुरू केली असता, काही जमीनमालकांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मुलुंड आणि भांडुप येथील दोन भूखंड मालकांनी पालिकेला हा भूखंड देण्याची तयारी दाखवली होती. त्यात, मुलुंड येथील ९१ हजार ९१४ चौरस मीटरची जागा या रुग्णालयासाठी योग्य असल्याचा निष्कर्ष पालिकेच्या समितीने काढला होता. मात्र त्यावर अंतिम निर्णय झाला नाही.

चार ते पाच हजार कोटींचा अपेक्षित खर्च
महारुग्णालय उभारण्यासाठी चार ते पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. रुग्णालय, प्रशासकीय इमारत, संशोधन केंद्र, डॉक्टरांसाठी निवासी संकुल बांधण्यात येणार होते. यासाठी किमान ८२ ते ८५ लाख चौरस फुटांचे बांधकाम करावे लागणार होते. खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या जागेवर रुग्णालय उभारण्याचा विचारही सुरू होता. तसेच राज्य सरकारने आर्थिक मदत करण्याची विनंती ही पालिकेने केली होती; परंतु काहीच निर्णय न झाल्याने हा प्रकल्प गुंडाळण्याची वेळ आली.

जम्बो कोविड केंद्रांवर भर
रुग्णालय उभारण्याचा निर्णय मागे पडल्यानंतर पालिकेने जम्बो कोविड केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पालिकेने रिचर्डसन ॲण्ड क्रुडास, एनएससीआय, बीकेसी, कांजूर, मालाड, कांदरपाडा, नेस्को, सोमय्या ही जम्बो कोविड केंद्र उभारली. या आठ जम्बो कोविड केंद्रांमध्ये ३५ हजार रुग्णशय्या आहेत. कोविड केंद्र उभारण्यासाठी पालिकेने २१५ कोटी रुपये खर्च केले आहेत. सध्या कोविड संसर्गाची तिसरी लाट नियंत्रणात आल्याने महारुग्णालय उभारण्याचा निर्णय मागे पडला; तर बाधित रुग्णांची संख्या अतिशय किरकोळ असल्याने निम्मे कोविड केंद्रदेखील बंद झाले आहेत.

जकात नाक्यांच्या भूखंडाचे क्षेत्रफळ -
- मानखुर्द ४१.५२ हेक्टर
- मुलूंड पूर्व पश्चिम, ऐरोली - ५.४४ हेक्टर
- दहिसर २.२ हेक्टर

...या होत्या खासगी जागा
मुलुंड ९१,९१४ चौरस मीटर
भांडुप ८५,८१२ चौरस मीटर

कोविड काळात आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला होता. पुढेदेखील आरोग्याचे प्रश्न अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मुंबईत अत्याधुनिक रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. मात्र महारुग्णालयाचा निर्णय रद्द केला, हे धक्कादायक आहे. सरकार अद्याप झोपलेले असून आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे दिसते.
- भीमेश मुतुला, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य रुग्ण सेवक व श्रमिक कामगार संघटना

राज्य सरकारच्या सूचनेनुसार महारुग्णालयासाठी जागा पाहिल्या होत्या. मात्र त्याबाबत सुरुवातीला गंभीर आरोप झाल्याने रुग्णालयाचा प्रकल्प गुंडाळावा लागला. त्याऐवजी आम्ही कोविड केंद्र उभारण्यावर भर दिला. महापालिका कोणत्याही आरोग्याविषयीच्या समस्येचा सामना करण्यास सक्षम आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top