कोव्हिड योद्धा कर्मचाऱ्यांचे पुर्नवसन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोव्हिड योद्धा कर्मचाऱ्यांचे पुर्नवसन
कोव्हिड योद्धा कर्मचाऱ्यांचे पुर्नवसन

कोव्हिड योद्धा कर्मचाऱ्यांचे पुर्नवसन

sakal_logo
By

ठाणे, ता. १० ः कोरोना काळात जिवाची पर्वा न करता दिवसरात्र सेवा देणाऱ्या ७०९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या रोजीरोटीची चिंता मिटविण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालिकेच्या आस्थापनावरील विविध विभागात सामावून त्यांचे ‘पुनर्वसन’ केले जाणार आहे. चौथ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊनही हा निर्णय घेण्यात आला असून तूर्तास तरी या कर्मचाऱ्यांची संपुष्टात आलेली मुदत सध्या दोन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या कोव्हिड योद्ध्यांप्रमाणे सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
दोन वर्षे थैमान घातल्यानंतर कोरोनाचा कहर आता शांत झाला आहे. ठाणे महापालिका हद्दीतील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या सरासरी दोनवर आली असून कोव्हिड रुग्णालयामध्येही अवघे दोन रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वसामान्य ठाणेकरांसाठी ही आनंदाची व आरोग्यदायी बाब असली, तरी कोरोनाची लाट ओसरल्यामुळे शेकडो कर्मचारी, कामगारांवर मात्र बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कोरोना संक्रमण सुरू झाल्यानंतर ठाणे महापालिकेने आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉयसह शेकडो कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली होती. संक्रमण संपताच त्यांची सेवा खंडित करता येईल, असे नियुक्तीच्या वेळीच स्पष्ट करण्यात आले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, सध्या कोरोनाचा धोका टळला असला, तरी चौथ्या लाटेचा संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे इतर कामगारांना पुढील सहा महिने वाढवून द्यावेत, अशी मागणी करीत माजी महापौर नरेश म्हस्के व त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु काम न करता पगार कसा देणार, असा प्रश्न पालिकेला पडला होता. त्यामुळे आता सुमारे ७०९ कामगारांना महापालिकेच्या इतर विभागात सामावून घेण्यात आले आहे. यामध्ये वॉर्डबॉय, आया व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

स्वच्छ ठाण्यासाठी मिळणार योगदान
यातील १२५ कामगारांना शहर स्वच्छतेच्या मोहिमेत उतरविण्यात आले आहे; तर काही कामगारांना स्मशानभूमी, आरोग्य केंद्र व इतर ठिकाणी पाठविण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top