सायन-पनवेल महामार्गावर एलईडीचा लखलखाट
सायन-पनवेल महामार्गावर एलईडीचा लखलखाटsakal

सायन-पनवेल महामार्गावर एलईडीचा लखलखाट

पाम बीचपासून कामाला सुरुवात; विजेसह खर्चातही बचत

खारघर : सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी-बेलापूर ते कळंबोलीपर्यंत बंद असलेले पथदिवे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि पनवेल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे परिसरात सर्वेक्षण केले. सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. निधीअभावी महामार्गावरील पथदिवे, त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा देखभाल-दुरुस्त करणे सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरापास्त झाले आहे. महामार्गावर पसरलेल्या अंधारामुळे अपघाताच्या घटना वारंवार वाढतात.

या सर्व गोष्टींचा विचार करून सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावेत, अशा प्रकारचे आदेश सरकारकडून निर्गमित करण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.
नवी मुंबई महापालिकेकडून प्रतिसाद मिळाला. मात्र पनवेल पालिकेची आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे पत्राला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर पनवेल महापालिकेने होकार दिला असून पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीबीडीतील भारती विद्यापीठ ते कळंबोली जंक्शन दरम्यानच्या पथदिव्यांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला आहे. प्रकिया पूर्ण करून पनवेल महापालिकेकडे हस्तांतर होताच पालिका पथदिवे सुरू करणार असून देखभाल-दुरुस्‍तीची जबाबदारी घेणार आहे.

सायन-पनवेल महामार्गावर पथदिव्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- संजय जगताप, शहर अभियंता, पनवेल महापालिका

पथदिवे हस्तांतर करण्यात यावे, यासाठी पनवेल महापालिकेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पत्रव्यवहार सुरू होता. नुकतेच संयुक्‍त विद्यमाने सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. महापालिकेने पुढील प्रक्रिया लवकर पूर्ण करून पथदिवे सुरू करावेत, यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.
- ओमप्रकाश परदेशी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com