
मत मांडण्यासाठी कोणाची गरज नाही
भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बोल काही राजकीय नेत्यांना चांगले वाटत होते. मात्र, आता त्यांचे घाव वर्मी लागत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २०) भिवंडीतील कार्यक्रमात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता लगावला. राज्यात सरकारला आव्हान देण्यासाठी भाजप सक्षम असून, आपली मते मांडण्यासाठी कोणालाही समोर करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील व ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील यांच्या संकल्पनेतून भिवंडी तालुक्यातील अंजूर दिवे ग्रामपंचायतीच्या वतीने कै. मनीबाई मोरेश्वर पाटील उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानाचे लोकार्पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, टीडीसीसी बँकेचे संचालक प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती. कोणतीही समस्या मांडण्यासाठी भाजपला कुणालाही समोर करण्याची गरज नाही. भाजप आपली लढाई लढण्यास सक्षम आहे. भाजपने पोलखोल यात्रा सुरू केली आहे. या यात्रेने सत्ताधारी व्यथित झाले असल्यामुळे यात्रेवर हल्ले केले जात आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..