दहा महिन्यांनंतर पोटात अन्नाचे घास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा महिन्यांनंतर पोटात अन्नाचे घास
दहा महिन्यांनंतर पोटात अन्नाचे घास

दहा महिन्यांनंतर पोटात अन्नाचे घास

मुंबई : घाटकोपर येथे डॉक्टरांनी गेल्या दहा महिन्यांपासून उपाशी असलेल्या एका ४२ वर्षीय रुग्णावर ‘लॅपरोस्कोपिक कार्डिओमायोटॉमी’ शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले आहे. ‘अचलेशिया कार्डिया’ या एक लाख लोकसंख्येत अवघ्या एक या प्रमाणात सापडणाऱ्या दुर्मिळ आजाराचे निदान या रुग्णाला झाले होते. त्यावर ‘झायनोव्हा शाल्बी’ रुग्णालयातील जनरल आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल यांच्या संपूर्ण पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

‘अचलेशिया कार्डिया’ हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे, तोंड आणि पोटात जोडणाऱ्या तसेच गिळण्याच्या नळीतून अन्न आणि द्रव जाणे कठीण होते. जेव्हा अन्ननलिकेतील नसा खराब होतात, तेव्हा अचलेशिया कार्डिया होतो. परिणामी अन्ननलिकांना अर्धांगवायू होतो, म्हणजेच त्या मृतप्राय होतात आणि कालांतराने त्या पसरत जातात आणि शेवटी पोटात अन्न घेण्याची क्षमता कमी होते व खाल्लेले अन्न तोंडातून बाहेर येते, असे लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल यांनी सांगितले.

४२ वर्षीय अमोल हे १० ते १२ महिन्यांपासून उपाशी होते. त्यांना अचलेशिया कार्डियाचा त्रास सुरू झाला होता. अन्न पोटात न गेल्यामुळे या रुग्णाला अशक्तपणा खूप आला होता. अन्ननलिकांचे नुकसान होऊन पोटात जाणाऱ्या अन्ननलिकांमधून खाल्लेले अन्न व द्रव पदार्थ आतड्यांमध्ये सरकत नाही, त्यामुळे ते अन्न उलटीवाटे परत येते. ॲसिडिटी व गॅसचा त्रास असेल म्हणून त्यांनी अनेक वैद्यकीय उपचार केले. एन्डोस्कोपी केल्यानंतर या आजाराचे निदान झाले व अमोलवर लेप्रोस्कोपिक कार्डिओमायोटॉमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये अन्ननलिकेतील स्नायूंना आलेला घट्टपणा सोडवून विस्तारित केले जाते व याचा परिणाम २४ तासांच्या आत दिसून आला. अमोल यांनी २४ तासांनंतर खाणे-पिणे सुरू केले आणि आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मज्जातंतूंचे आकुंचन
जेव्हा एखादी सामान्य व्यक्ती अन्न गिळते तेव्हा, त्याच्या अन्ननलिकेचे स्नायू लयबद्ध पद्धतीने आकुंचन पावतात. ज्याच्या मदतीने गिळलेला घास, अन्न खाली सरकते. अन्न खाली गेल्यावर तिथे असलेला वॉल्व्ह पुन्हा घट्ट बांधला जातो. त्यामुळे पोटात तयार झालेले अन्न आणि आम्ल अन्ननलिकेत परत जाऊ शकत नाही. पण, अचलेशिया कार्डिया आजार असलेल्या व्यक्तींमध्ये पोटातील मज्जातंतूंचे आकुंचन होते. या विस्ताराला ‘पेरिस्टॅलिसिस’ म्हणतात.

एक लाखात एक रुग्ण
अन्न पोटात अधिक सहजतेने जाऊ देण्यासाठी एसोफगेयल स्फिंक्टरच्या म्हणजेच अन्ननलिकेच्या खालच्या टोकाला स्नायू कापला जातो. त्यामुळे अन्न परत तोंडात येत नाही. अचलेशिया कार्डिया हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये दुर्मिळ आजार मानला जातो. एक लाख नागरिकांमध्ये एक रुग्ण असे प्रमाण सध्या असले, तरी यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचा सहभाग नाही. या आजारामध्ये अनेक वेळा उपचार करण्यास विलंब होतो. त्यामुळे हे रुग्ण मानसिक दडपणाखाली असतात, असेही डॉक्टर सांगतात.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top