चार्जिंग स्टेशन उभारा कर सवलत मिळवा! मिरा-भाईदर पालिकेची योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार्जिंग स्टेशन उभारा कर सवलत मिळवा! मिरा-भाईदर पालिकेची योजना
चार्जिंग स्टेशन उभारा कर सवलत मिळवा! मिरा-भाईदर पालिकेची योजना

चार्जिंग स्टेशन उभारा कर सवलत मिळवा! मिरा-भाईदर पालिकेची योजना

sakal_logo
By

भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : मालमत्ता कराचा विशिष्ट मुदतीत ऑनलाईन भरणा केल्यास करात सवलत देण्याची योजना मिरा-भाईंदर महापालिकेने याआधीच आणली आहे. आता या योजनेच्या जोडीनेच इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्यांनाही करात सवलत देण्याची योजना पालिकेने आखली आहे. २९ एप्रिलला होणाऱ्या महासभेत त्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला सरकारकडून विविध प्रकारचे प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या व्यक्तींना आणि गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिरा-भाईंदरमधील नागरिकांना देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार परिस्थितीकीय दृष्ट्या लाभदायक योजनेच्या अंमलबजावणीसाठी मालमत्ता करात सवलत देण्याचा अथवा परतावा देण्याची तरतूद आहे. त्यात पावसाच्या पाण्याचे नियोजन, सौरऊर्जेचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी योजना, तसेच राज्य सरकार आणि महापालिकेने निश्चित केलेली कोणतीही योजना यांचा समावेश होतो.
त्यामुळे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या व्यक्ती आणि गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात सवलत देण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. २९ एप्रिलला होणाऱ्या महासभेत त्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. याव्यतिरिक्त मालमत्ता कर विशिष्ट मुदतीत भरला किंवा तो ऑनलाईन भरला तरीदेखील करदात्यांना सवलत देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावावरही २९ एप्रिलच्या महासभेत निर्णय होणार आहे.

काय आहेत सरकारी तरतुदी?
स्वत:च्या इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन बांधल्यास आणि त्यातून इतर वाहनधारकांना चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिल्यास मालमत्ता करात दोन टक्के सवलत देणे. गृहनिर्माण संस्थांमध्ये त्यांच्या सदस्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा निर्माण केल्यास मालमत्ता करात पाच टक्के इतक्या कमाल मर्यादेत सवलत देणे. गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या मालकीच्या जागेत व्यापारी तत्त्वावर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा निर्माण केल्यास त्याला व्यावसायिक दराने मालमत्ता कराची आकारणी न करता ती निवासी दराने करणे आदी तरतुदी सरकारने केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top