
बसथांबा समस्यांच्या विळख्यात
धारावी, ता. २४ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेवरील माहीम स्थानकाबाहेरील सेनापती बापट मार्गावरील दादरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील ‘बेस्ट’च्या बस थांब्यावर कपडे सुकत घातले जात आहेत, तसेच तिथेच जेवण बनवण्यासाठी चूल मांडण्यात आली आहे. रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबांनी बस थांब्याला निवासस्थान बनवले आहे. यामुळे प्रवाशांना थांब्यावर उभे राहणे कठीण होत आहे.
थांब्यावर विविध साहित्य ठेवल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांना नाक मुठीत धरून बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. अनेक प्रवासी थांब्यावरील त्रासामुळे मुख्य रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहतात. अनेकदा लहान मुले थांब्यावरच खेळत असल्याने प्रवाशांना नाइलाजाने थांब्यापासून दूरवर उभे राहावे लागते. सध्या उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. मात्र थांब्यावरील अव्यवस्थेमुळे प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. जर थांबा समस्यामुक्त झाला तर प्रवाशांना निवांतपणे थांब्यात बसून बसची प्रतीक्षा करता येईल, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..