
शिवसेनेतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ ः प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी २७ गावांचा ग्रामीण भाग डोंबिवली शहरी भागात विलीन करण्याचा निर्णय शिवसेना पक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार आता २७ गावांतील कामकाज डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून चालणार आहे. गावांचा कारभार शहर शाखेच्या हाती गेल्याने गावातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून २७ गावांतील २५ पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठविला आहे. या राजीनामा नाट्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
डोंबिवलीतील एका कार्यकर्त्याला आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या सांगण्यानुसार वरिष्ठांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भाग डोंबिवली शिवसेना शहराध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असेल, तर ग्रामीण भागातील पदांना अर्थ काय, असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघापैकी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे; परंतु अंतर्गत गटबाजीमुळे मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बालेकिल्ला गमवावा लागला. विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील भोईर यांचे तिकीट कापून रमेश म्हात्रे यांना देण्यात आले. त्या वेळेस शिवसेनेत दोन गट पडल्याचे उघड झाले होते.
--------
खासदारांचे खास डोंबिवली शहरप्रमुख
शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मोरे यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवायची असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. डोंबिवली किंवा ग्रामीण भागातून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून मोरे यांना पुढे करण्याचा प्रयत्न सेनेच्या वरिष्ठ गटातून सुरू आहे. ही
-------
२५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
२५ पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला असून यामध्ये कल्याण तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, युवा सेना उपविधानसभा अधिकारी, युवा समन्वयक, सहसंघटक विधानसभा क्षेत्र, शाखाप्रमुख या सर्वांचा समावेश आहे.
--------
कोट
महापालिका क्षेत्रात २७ गावे असून प्रशासकीय कामाचा भाग म्हणून सर्व प्रभागांचे काम डोंबिवली शहर शाखेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी ग्रामपंचायती असल्याने ग्रामपंचायत कायदा, कामकाजानुसार पक्षाचे कामकाज चालायचे. प्रशासकीय निवडणूक कामकाजासाठी केवळ हे बदल करण्यात आले आहेत. माझ्याकडे एकाही पदाधिकाऱ्याचा राजीनामा आलेला नाही. त्यांची नाराजी असल्यास ती काढायला आम्ही सक्षम आहोत.
- गोपाळ लांडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख, कल्याण
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..