
राणा दाम्पत्य कारागृहात
मुंबई, ता. २४ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधाने केल्यामुळे राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाही गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर २९ एप्रिलला सुनावणी निश्चित केल्याने त्यांचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ‘मातोश्री’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हानही त्यांनी दिले होते. त्यामुळे गेले दोन दिवस मुंबईत राणा विरुद्ध शिवसेना असा सामना चांगलाच रंगला होता. त्यावरून वांद्रेसह राणांचे निवासस्थान असलेल्या खार परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावरून राणा पती-पत्नीविरोधात खार पोलिस ठाण्यात दोन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात राज्य सरकारला आव्हान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेली वादग्रस्त विधाने यामुळे त्यांच्यावर भादंवि १२४ (अ) नुसार राजद्रोहाचा गंभीर आरोप ठेवण्यात आल्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. याशिवाय कलम १५३ (अ) नुसार समाजात तेढ निर्माण करणे, अशांतता निर्माण करणे, चिथावणीखोर विधाने करणे, कलम ३५३ नुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे, मुंबई पोलिस कायद्याच्या कलम १३५ नुसार पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, आदी आरोपही राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आले.
पोलिसांनी शनिवारी (ता. २३) दोघांना अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. मुंबई पोलिसांनी दोघांच्याही पोलिस कोठडीची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, राणा दाम्पत्याने स्वतंत्र जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. पोलिसांनी २७ एप्रिलपर्यंत जामिनावर भूमिका स्पष्ट करावी, असे न्यायालयाने निर्देश दिले. तसेच जामीन अर्जावर २९ एप्रिलला सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे. तोपर्यंत राणा पती-पत्नींचा मुक्काम कारागृहात असणार आहे.
पोलिसांनी दाखल केलेले आरोप आधारहिन असल्याचा दावा राणा यांच्या वतीने ॲड. रिझवान मर्चंट यांनी केला आहे. हनुमान चालिसा भक्तिपूर्ण आहे, मग ती म्हणण्यात गुन्हा कसा, असा युक्तिवाद त्यांनी केला.
----
पोलिसांचे म्हणणे काय?
मशिदीवरील भोंगे काढण्याच्या काही राजकीय पक्षांच्या आंदोलनाच्या पार्श्र्वभूमीवर अमरावतीहून मुंबईत येणाऱ्या राणा पती-पत्नींनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलन करण्याचे चिथावणीखोर विधान केले. प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुंबई राज्याची राजधानी आहे; मात्र येथे येऊन दंगलसदृश परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये रविवारी उपस्थित राहणार आहेत, हे माहिती असूनही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे खार पोलिसांनी रिमांड अर्जात म्हटले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..