
हापूस
अक्षय्यतृतीयेसाठी हापूसची आवक वाढली
किरकोळ बाजारात डझनाला ७०० ते ९०० रुपये
वाशी, ता. २५ (बातमीदार)ः हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला असून आता कुठे आंबा सामान्यांच्या आवाक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांचा दर ७०० ते ९०० रुपयांपर्यंत आहे. अक्षय्यतृतीयेसाठी बाजारात आंब्यांची आवक वाढल्याचे व्यापारी सांगतात.
एपीएमसीमध्ये जानेवारी महिन्यापासून आंबा येण्यास सुरुवात झाली असली, तरी प्रत्यक्षात आंब्यांचा हंगाम मार्च महिन्यापासून सुरू झाला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आंब्यांची आवक अपेक्षेएवढी झाली नाही. कोकणातील हवामान बदलाचा फटका आंब्याला बसला आहे; मात्र आता एपीएमसीत रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्गसह कर्नाटकी हापूस आंब्याची आवक वाढली आहे. शनिवारी ६० हजार पेट्यांची आवक एपीएमसीत झाली आहे.
अक्षय्यतृतीयेसाठी मुंबईसह राज्यभरातून आंब्याला मागणी वाढते. सुरुवातीला एका आंब्याच्या पेटीचा दर ७,००० ते १०,००० रुपयांपर्यंत होता. आता दर कमी झाला असून १,२०० ते ३,५०० पर्यंत आला आहे. आंब्याचे दर हे आता सर्वसामन्यांच्या आवाक्यात येण्यास सुरुवात झाल्याचे संजय पानसरे या व्यापाऱ्याने स्पष्ट केले.
गतवर्षीच्या तुलनेत हापूस आंब्याची आवक कमी आहे. घाऊक बाजारात आंब्याच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे; मात्र किरकोळ बाजारात दर अजूनही चढेच आहेत. अक्षय्यतृतीयेसाठी किरकोळ बाजारातील खरेदीदारांनी आंबे खरेदीस सुरुवात केल्याचे मार्केट यार्डातील आंबा व्यापाऱ्यांनी सांगितले.