
रस्त्याने घेतला मोकळा श्वास
अलिबाग, ता. २८ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत होत असण्याच्या मार्गावर असताना, त्यांच्या मार्गाच्या दुतर्फा ठिकठिकाणी कचरा टाकण्यात येतो. यामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थितीबरोबरच दुर्गंधी पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागाव आणि आक्षी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकू नये, असे फलक लावले असून स्वच्छतेबाबत ग्रामस्थांमध्ये जागृतीही सुरू केली आहे.
जिल्ह्यातील रायगड किल्ल्यासह अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. नागाव, आक्षी, काशीद, रेवदंडा आदी समुद्रकिनारेही पर्यटकांना खुणावतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते; परंतु गावांना जोडणारे रस्ते हे कचऱ्याची ठिकाणे झाली आहेत. गावामध्ये कचरा विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प नसल्याने ग्रामस्थ रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुर्गंधीमुळे आजार निर्माण होण्याची भीती आहे. पावसाळ्यात हा कचरा नाल्यात अडकून राहिल्यास पुराचा धोका ही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विषय चिंतेचा आहे. नागाव व आक्षी ग्रामपंचायतीने ही समस्या ओळखून दुतर्फा कचरा टाकण्यावर अंकुश ठेवण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग-रेवदंडा तसेच सहाण बाह्यमार्गावरील बाजूपट्टीवर पडलेल्या कचऱ्याची ग्रामपंचायतीने विल्हेवाट लावून त्याठिकाणी कचरा न टाकण्याचे सूचना फलक लावले आहेत. कचरा टाकलेला दिसून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही काढण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35378 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..