पक्षी घरट्यांमध्ये विसावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षी घरट्यांमध्ये विसावणार
पक्षी घरट्यांमध्ये विसावणार

पक्षी घरट्यांमध्ये विसावणार

sakal_logo
By

अमित गवळे, पाली
निसर्गात विविध पक्षी, कीटक, प्राणी पावसाचा अंदाज देत असतात. पक्ष्यांची घरटी बांधण्याची पद्धत, वापरलेले साहित्य व घरट्याची उंची यावरून पाऊस किती पडणार, याचा अंदाज वर्तवणे सहज शक्य होते. जिल्ह्यात अशाच पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू झाली आहे. विणीच्या हंगामालाही सुरुवात झाल्याच्या नोंदी पक्षी निरीक्षकांनी नोंदवल्या आहेत. परिणामी, यंदा जिल्ह्यात पाऊस लवकर व मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे.
----------------------
विळे येथील पक्षी निरीक्षक व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी येथील परिसर व जंगलात भटकंती करताना अशा अनेक घटनांच्या नोंदी केल्या आहेत. एप्रिल ते सप्टेंबर अनेक पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो. या हंगामात पक्ष्यांची घरटी बांधण्यासाठी रेलचेल सुरू असते. कावळ्यांनी तर चक्क आपले घरटे बनवून त्यात अंडी उबवण्यासाठी आळी-पाळीने घरट्यातील मुक्काम वाढवला आहे. बहुतांशी घरटी झाडाच्या वरच्या भागात बांधली असून, घरट्यांसाठी काटक्यांबरोबर तारांचा वापर अधिक केला आहे. दयाळ पक्षीही घरट्याच्या तयारीला लागले आहेत. नर पक्षी पाण्यातील शेवाळ आणि काड्या गोळा करत आहेत. तर मादीही त्याला हातभार लावत आहे. साळुंख्याही काट्या गोळा करून आपले घरटे बनवण्याच्या तयारीला लागल्या आहेत. त्यांच्या विणीच्या हंगामाची तयारी चालू आहे. नारिंगी कस्तुर हा देखील आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. महाभृंगराज (रॉकेट-टेल-ड्रोन्गो) या पक्ष्याने आपले घरटे घनदाट जंगलात तयार करून त्यातील अंडी उबवण्याचे काम सुरू केले आहे. तर पांढऱ्या पोटाचा कोतवाल या पक्ष्याची पिल्ले घरट्यातून डोकावताना दिसत आहेत. बुरख्या हळद्या (ब्लॅकहूडेड ओरिओले) या पक्ष्याचे नर जंगलामध्ये झाडाच्या उंच फांदीवर बसून शीळ मारत मादीचा शोध घेत आहेत, अशा नोंदीही नोंदवल्या आहेत.

-------------------------
आयत्या घरात घरोबा
पाटणुस येथील कुंडलिका विद्यालयाजवळ असणाऱ्या एका मोठ्या झाडावर अगदी शेंड्याच्या जवळ कावळ्याने घरटे बांधून संसार थाटला आहे. या घरट्यात आपली अंडी टाकण्यासाठी कोकिळेची धावपळ दिसत आहे. विळे येथे मुंढे यांच्या घरामागे गेल्या आठवड्यात कोकिळेचे चार नर आणि एक मादी हे एका झाडावर बसलेले होते आणि त्यांची कावळ्याच्या घरट्याच्या शोधात भटकंती चालू होती.

खंड्याची घरट्यासाठी धडपड
पाटणुस परिसरात पांढऱ्या छातीचा धीवर म्हणजेच खंड्या आपल्या मादीसोबत घरट्यासाठी जागेचा शोध घेऊन बीळ खोदण्याच्या तयारीला लागल्याचे निरीक्षण मुंढे यांनी नोंदवले आहे. मागच्या वर्षी जी पिल्ले घरट्यातून बाहेर पडली आहेत, ती आता मोठी झाली आहेत. त्यांनी आपले जोडीदार निवडून घरट्यासाठी जागा शोधणे सुरू केले आहे. या ठिकाणी अशी चार ते पाच खंड्या पक्ष्यांच्या जोडप्यांची घरटे बांधण्याची म्हणजेच बीळ खोदण्याचे काम चालू आहे.

इतर संकेत
पक्ष्यांप्रमाणेच घरातील काळ्या व लाल मुंग्या आपले खाद्यान्न सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जागेचा शोध घेत आहेत. तसेच शेकडोंच्या संख्येने खाद्यान्न घेऊन जाताना त्यांची रेलचेल आहे. बहावा, ताम्हण, कवची/कौसी, पांगारा, पळस, सावरी या झाडांना अगदी योग्य वेळेत फुलांचा बहर आला आहे. हे सर्व संकेत यंदा पाऊस लवकर व मुसळधार बरसण्याचे आहेत.

------
निसर्ग निरनिरळ्या प्रकारे प्रत्येक ऋतूचा अंदाज देत असतो. धावपळ आणि धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाने या निसर्गाकडे कानाडोळा केल्यामुळे सद्यस्थितीत निसर्ग निरीक्षणाचा अभ्यास कमी झाला आहे. त्यामुळे माणसाला जरी नाही समजले तरी प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पती यांना मात्र निसर्गचक्र पूर्णपणे समजते. त्यामुळे निसर्गातील ही रेलचेल पाहून असा अंदाज येतो की या वर्षी वरुण राजा धो-धो कोसळणार आहे.
- रामेश्वर श्रीराम मुंढे, पक्षी अभ्यासक, विळे, माणगाव

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35391 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top