
पक्षी अभ्यास केंद्रामुळे पर्यटनाला चालना
अलिबाग ः प्रमोद जाधव
किहीम येथे पक्षी शास्त्रज्ञ सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास केंद्र उभारण्यात येत आहे. केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रादेशिक पर्यटनातून यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. केंद्राच्या इमारतीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. अभ्यास केंद्रामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
अलिबागपासून काही अंतरावर किहीम गाव आहे. गावाला विस्तीर्ण समुद्रकिनारा असून दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक पर्यटक याठिकाणी भेट देतात. पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास येत असल्याने स्थानिक व्यावसायिकांना रोजगार मिळू लागला आहे. लहान मोठे हॉटेल, कॉटेज व्यावसायिकांना पर्यटनातून आर्थिक बळ मिळत आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने किहीमची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने गावाचे महत्त्व वाढत आहेत. किहीममध्ये पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांचे वास्तव्य आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांवर त्यांनी संशोधन केले आहे. त्यामुळे किहीमला एक ऐतिहासिक ठेवा प्राप्त झाला आहे.
पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाने पक्षी अभ्यास केंद्र सुरू करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषद व वन विभाग यांच्या माध्यमातून अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. किहीम येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांच्या नावाचे पक्षी अभ्यास केंद्र सुरू केले जाणार आहे. शाळेच्या ३० गुंठे क्षेत्रामध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. दोन टप्प्यात या प्रकल्पाचे काम केले जाणार आहे.
जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाखांचा निधी
पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत, शाळेची दुरुस्ती केली जाणार आहे. कौल काढून संपूर्ण इमारतीमध्ये स्लॅबद्वारे बांधकाम केले जाणार आहे. नवीन खिडक्या-दरवाजे लावले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. फेब्रुवारीपासून काम सुरू झाले आहे. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. नवीन खिडक्या अन्य कामे युद्धपातळीवर सुरू आहे. उर्वरित संरक्षक भिंत व अन्य कामांसाठी प्रादेशिक पर्यटनातून एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. डिसेंबरपर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण होणार असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.
डिजिटल माहिती केंद्र
इमारतीत डॉ. सलीम अली यांच्याविषयी माहिती सांगणारे अभ्यास केंद्र असेल. अली यांनी पक्ष्यांविषयी लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचे ग्रंथालय असेल. देशातील वेगवेगळ्या जातीच्या, तसेच कोकणातील वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती पर्यटक व स्थानिकांना मिळावी, यासाठी डिजिटल माहिती केंद्र तसेच पक्ष्यांविषयी असलेली वेगवेगळे पुस्तकांसाठी विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे. हे सर्व केंद्र डिजिटल स्वरूपाचे राहील.
किहीम येथील डॉ. सलीम अली यांच्या नावाच्या पक्षी अभ्यास केंद्रासाठी आतापर्यंत दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जुन्या इमारतीऐवजी अद्ययावत इमारत बांधण्यासाठी स्लॅबद्वारे बांधकाम सुरू आहे. आतापर्यंत ९० टक्के काम झाले आहे. उर्वरित काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.
- के. वाय. बारदेस्कर
कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषद.
डॉ. सलीम अली यांचे किहीममध्ये घर होते. त्यांच्या वाडीमध्ये माझे वडील बाळकृष्ण पाटील (बाबू भंडारी) माळी म्हणून काम करीत होते. त्यामुळे सलीम यांना लहानपणापासून जवळून पाहिले आहे. किहीम येथील तलावात मोठ्या प्रमाणात पक्षी येत असत. त्याठिकाणी सलीम अली पहाटे जाऊन पक्ष्यांचा अभ्यास करायचे. सावर व पारंगा या झाडांना फुले आल्यावर त्या ठिकाणी पक्षी येतात. किहीम येथे पक्षी अभ्यास केंद्र बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अभ्यास केंद्रामुळे पर्यटन वाढीला अधिक चालना मिळेल.
- रमेश पाटील, माजी उपसभापती,
कृषी उत्पन्न बाजार समिती.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35394 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..