सुधागड किल्ल्याला संरक्षित दर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधागड किल्ल्याला संरक्षित दर्जा
सुधागड किल्ल्याला संरक्षित दर्जा

सुधागड किल्ल्याला संरक्षित दर्जा

sakal_logo
By

अमित गवळे, पाली
शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्याला लवकरच राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार आहे. या संदर्भातील अंतिम अधिसूचना राज्य पुरातत्त्व विभागाने शासनाकडे म्हणजेच महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. शिवाय किल्ल्याची दुरुस्ती व आराखडा तयार करण्यासाठी पाच कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. संरक्षित दर्जा मिळाल्यास किल्ल्याचे रूप पालटणार आहे. पर्यटन वाढीसह तालुक्यात रोजगारवृद्धी होईल. तसेच देदीप्यमान इतिहास उजेडात येणार आहे. यामुळे स्थानिकांसह इतिहास अभ्यासक, दुर्गप्रेमी सुखावले आहेत.
सुधागड किल्ला इ.स. १६४८ मध्ये नारो मुकुंद यांनी मुघलांकडून जिंकला आणि तो शिवरायांच्या स्वराज्यात दाखल झाला. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ६२० मीटर आहे. सुधागड किल्‍ल्याच्या सखल भागाचे क्षेत्रफळ सुमारे ५५ हेक्टर आहे. सरकारने पुरातत्त्व विभागास सुधागड किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुरातत्त्व विभागाने मंत्रालयात नोटिफिकेशन पाठविले. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सुधागड किल्ल्याचा जतन दुरुस्ती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पुरातत्त्व विभाग साहाय्यक संचालक विलास वाहणे व त्यांच्या टीमने सुधागड किल्ल्याची वास्तू आणि जाणाऱ्या मार्गांची पाहणी केली. त्यानंतर किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी अधिसूचना (नोटिफिकेशन) काढण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

सुधागड किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक करण्याची कारवाई सुरू असून या संदर्भातील अंतिम अधिसूचना राज्य पुरातत्त्व विभागाने शासनाकडे म्हणजेच महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाकडे मंजुरीसाठी नुकतीच पाठवली आहे. मंत्रालयातून ही मंजुरी मिळाल्यावर सुधागड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात येईल व पुढील कामांना सुरुवात होईल.
- विलास वाहणे, साहाय्यक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग

सुधागड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ला संरक्षित झाल्यास येथील इतिहास सर्वदूर पोहचेल. तसेच पर्यटन वाढीला चालना मिळेल. रोजगार निर्मिती होईल.
- उमेश तांबट, मालक, सुधागड ट्रेकर्स

पाच कोटींचा निधी मंजूर
किल्ल्याचा जतन दुरुस्ती आराखडा बनविण्यासाठी तसेच किल्ल्याचा महादरवाजा व संरक्षक भिंत आणि इतर किरकोळ दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. याची निविदा तयार झाली असून ती मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकमेव किल्ला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी ५-६ किल्ले निवडले आहेत. प्रथमदर्शी स्वरूपात या किल्‍ल्‍यांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी एक समितीही नेमली आहे. कोकणातील सुधागड, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या तीन किल्ल्यांचा समावेश आहे. त्यातील रायगड जिल्ह्यातील सुधागड हा एकमेव किल्ला निवडण्यात आला आहे. त्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे किल्ले केंद्राने संरक्षित केले आहेत. मात्र सुधागड किल्ला अद्याप असंरक्षित असल्याने त्याला संरक्षित केले जात आहे.

भोराई देवीचा उत्‍सव
पालीवरून १२ किमीवर नाडसूर गाव आहे. नाडसुरकडे जातांना पूर्वेकडे दीड किमीवर धोंडसे गावावरून चालत सुधागडवर जाता येते. साधारण दोन तास चालावे लागते. किल्‍ल्यावर जातांना तीन मुख्य दरवाजे लागतात. सुधागडवर पाश्चापूर-दर्यागाव गावातूनही जाता येते. किल्ल्यावर पंत सचिवांचा सरकार वाडा, दोन मोठी तळी, धान्य कोठार, घरांचे अवशेष, पाण्याच्या टाक्या व हौद आहे. तसेच घोडेपागा, अंबरखाना, सदर विभाग, बारूद खाना, भुयारी मार्ग, तटबंदीची दुरवस्‍था झाली आहे. शंकराचे देऊळ तसेच भोराई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या देवीच्या नावावरून किल्ल्याला भोराई गडही बोलले जाते. पूर्वी येथे भोर संस्थांन असल्‍याने भोरप्याचा डोंगर किंवा भोरपगड असे देखिल संबोधले जायचे. नवरात्रीच्या गडावर नऊ दिवस भोराई देवीचा उत्सव चालतो.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35397 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top