
ज्यू धर्मियांचे वारसास्थळ
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग ः ज्यू धर्मीय भारतात कधी आले याचे ठोस पुरावे नाहीत, तरी साधारण दोन हजार वर्षांपूर्वी ज्यू लोक समुद्रामार्गे मजल दरमजल करीत भारत भूमीवर सर्वप्रथम अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे उतरल्याची धारणा ज्यू धर्मियांमध्ये आहे. येथूनच त्यांची भारतभ्रमंती सुरू झाली. इस्राईल देशाच्या निर्मितीनंतर त्यातील बहुतांश इस्राईलला स्थायिक झाले. मात्र आजही त्यांची भारताची जवळीक आहे. ‘जेरुसलेम गेट’ या नावाने नवगाव येथे त्यांच्या आदीपुरुषांची स्मशानभूमी आहे. या ठिकाणाचा ‘ज्यू धर्मियांच्या सांस्कृतिक वारसा स्थळ’ म्हणून विकास करण्याची घोषणा पाच वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, समन्वयाअभावी काम रखडले आहे.
जेरुसलेम गेटच्या सुशोभीकरणासह आवास येथे ज्यू लोकांच्या भारतीय जीवनपद्धतीची माहिती देणारे संग्रहालय उभारण्यासाठी ज्यू समुदायाने पुढाकार घेतला आहे. संग्रहालय झाल्यास देशविदेशातील पर्यटक, इतिहासकार अलिबागमध्ये मोठ्या संख्येने येतील आणि येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, अशी संकल्पना आहे.
स्थानिक समुदयाबरोबर समरस झालेले ज्यू धर्मीय लोक इस्राईल देशाची निर्मिती झाल्यानंतर आपल्या हक्काच्या देशात परत गेले. मात्र तरीही अनेकजण अलिबाग येथील ‘जेरुसलेम गेट’ या वारसा स्थळांला आवर्जून भेट देण्यासाठी येतात. सध्या या स्थळाची दुरवस्था झाली असून पर्यटनाच्या दृष्टीने विकासासाठी ज्यू समुदायाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. राज्य शासनानेही मूलभूत सुविधा पुरविण्याची तयारी दर्शवली आहे. यावर अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र त्यानंतर वारसा स्थळाचे काम रखडले आहे. इंडिया ज्यू काँग्रेस आणि इस्त्रायलीमध्ये स्थायिक झालेल्या ज्यू समाजाकडून नवगाव येथे सांस्कृतिक वारसा स्थळाच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. नवगाव या ठिकाणी असलेल्या ‘जेरुसलेम गेट’ या स्थळाचा विकास करताना स्मृतिस्तंभाची बांधणी, परिसराचे सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्याशी ऋणानुबंध
ज्यू समाजाचे रायगड जिल्ह्याशी विशेष ऋणानुबंध आहे. सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात जिल्ह्यातील नागावजवळ ज्यू (इस्रायली) येऊन पोचले. यांच्या पूर्वजांचा व्यवसाय तेल घाणीचा असल्याने आणि शनिवार हा त्यांचा रजेचा दिवस (ज्याला ‘सब्बाथ’ असे म्हटले जाते ) असल्याने महाराष्ट्रात त्यांना ‘शनिवार तेली’ म्हणूनही ओळखण्यात येते. महाराष्ट्रात आलेल्या ज्यू लोकांचा समुदाय ''बेने इस्रायली'' म्हणून ओळखला जातो. आजही अनेक गावांमध्ये ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ ‘सिनेगॉग’ दिसून येतात.
गावाच्या नावावरून आडनाव
ज्यू लोकांचा स्वभाव स्थानिक संस्कृतीशी मिळून-मिसळून घेण्याचा असल्यामुळे त्यांची आडनावेही त्यांच्या गावाच्या नावाप्रमाणे असतात. उदाहरणार्थ, रेवदंडेकर, पेणकर, उरणकर वगैरे. नागरी मराठी किंवा प्रमाण भाषेपेक्षा थोडा उच्चाराचा हेल वेगळी असलेली मराठी बोलीभाषा ते बोलतात, ज्याला ‘जुदाव मराठी’ असे बोलले जाते. गणपती विसर्जनासारख्या अनेक मराठी सांस्कृतिक सोहळ्यामध्ये त्यांचा सहभाग असतो.
बेने इस्त्रायली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांनी आपल्या आश्रयभूमीशी असलेले नाते कायम ठेवले आहे. काही वर्षांपूर्वी जोनाथान मोझेस वाक्रुळकर, जॉनथॉन सोलमन, जॉन पेरी पेझारकर, विजू पेणकर त्यांचे एक शिष्टमंडळ अलिबाग येथे आले होते. या भूमीशी असलेले नाते अधिक वृद्धींगत करण्याची त्यांची इच्छा आहे. ते सतत संपर्कात असून नवगाव येथील स्मृतिस्थळाच्या सुशोभीकरणाबाबत पाठपुरावा करीत आहेत. या कामासाठी १५ लाख रुपये देण्यात आले आहेत. हे काम खूप महत्त्वाचे असून अलिबागला नवी प्रतिष्ठा मिळवून देणारे आहे.
- आ. जयंत पाटील
वारसा स्थळाची सध्या दुरवस्था झाली नाही. संरक्षण भिंतीसह इतर माहिती देणारी वास्तू येथे उभारणे गरजेचे आहे. भारतासह इस्राईलमधील आमच्या समाज बांधवांनी एकत्र येत लोकवर्गणीतून स्थळाचा विकास करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली, मात्र अद्याप पाठपुरावा झालेला नाही. या स्थळाचा विकास झाल्यास अलिबागची ओळख जागतिक पर्यटन स्थळ म्हणून होईल.
- हेलझेल भोनकर, अध्यक्ष, अलिबाग ज्यू समाज
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35402 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..