
दरडीचा विळखा वाढला
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : रायगड जिल्ह्यात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडतात. वाढते नागरीकरण, वृक्षतोड, उत्खननामुळे दरडप्रवण गावांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने नुकत्याच सादर केलेल्या
मान्सूनपूर्व अहवालात दरडीचा धोका वाढत असल्याचे नमूद केले आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला असून दरडी रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. २००५ मध्ये रायगड जिल्ह्यात ८४ गावे दरडप्रवण म्हणून घोषित करण्यात आली होती. ही संख्या २०१५ पर्यंत १०३ आणि यंदा केलेल्या रॅपिड सर्वेक्षणात २११ इतकी झाली आहेत.
दरडप्रवण भागाचा शोध घेऊन अशा घटना घडू नयेत, यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यातील गावांची संख्या दर वर्षी वाढतच आहे. गेल्या १७ वर्षांत ३०२ जणांचा दरडीखाली मृत्यू झाला आहे; तर कोट्यवधींची वित्तहानी झाली आहे. तळिये, जुई, दासगाव या गावांचे अस्तित्वच मिटले आहे. त्यामुळे गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरडी रोखण्यासाठी दर वर्षी कोट्यवधींची तरतूद करण्यात येते; मात्र पावसाळा सुरू होताच प्रशासनाचे प्रयत्न फोल ठरल्याचे दिसते. संपर्काची अद्ययावत यंत्रणा नसल्याने दरडी कोसळून कित्येक तास झाले, तरी प्रशासनाला कल्पना नसते. यंदाही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी सज्ज असल्याचा दावा केला आहे. हा दावा किती खरा ठरणार, हे पावसाळा सुरू झाल्यावरच समजू शकेल.
स्थानिकांच्या सहभागाची गरज
दरडीचा धोका भविष्यात वाढतच जाणार असल्याने स्थानिक पातळीवर नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे मत भूशास्त्र तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोणत्या भागात दरड कोसळणार आहे, याची पूर्वकल्पना दरड कोसळण्याच्या काही तास आधी स्थानिकांना येऊ शकते. दरड कोसळण्यापूर्वी होणाऱ्या भूगर्भीय बदलाची माहिती शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागरिकांना दिल्यास, दरड कोसळण्याची आगावू माहिती स्थानिक प्रशासनाला देऊ शकतात. त्यामुळे आवश्यक उपाययोजना करण्यास वेळ मिळू शकतो, अशी माहिती पुण्यातील एस.पी. विद्यापीठाचे भूगर्भतज्ज्ञ डॉ. सतीश ठिगळे यांनी सांगितले.
२००५ पासून दरडींचा शास्त्रशुद्ध अभ्यास
२६ जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये दक्षिण रायगडमध्ये १७ गावांमध्ये दरड कोसळून जुई, दासगाव, कोंडिवते येथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करून दरडी रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्या भागात दरडी कोसळण्याची लक्षणे असतील त्या गावांचा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून अभ्यास केला जात आहे.
दरड कोसळण्याची कारणे
- कमी वेळेत ५०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक
- दरडप्रवण गावांमधील डोंगरउतारावर उत्खनन
- डोंगरउतारावर पावसाचा पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्यास
- कमकुवत भूपृष्ठावर झाडांचे कमी झालेले प्रमाण
घटनेपूर्वी दिसणारे भूगर्भीय बदल
- पावसाळ्यात गढूळ, गरम पाण्याचे झरे वाहणे
- जमिनीला, घरांना तडे जाणे
- भूगर्भातून आवाज येणे
- नैसर्गिक झऱ्यांचा प्रवाह वाढणे
- डोंगरमाथ्यावरील दगड घरंगळणे
- डोंगरातून जाणाऱ्या रस्त्यांना तडे जाणे
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून केलेल्या रॅपिड सर्व्हेमध्ये २११ गावांना दरडीची लक्षणे दिसत आहेत. यातील १४५ गावांचे सर्व्हे पूर्ण झाला असून दरडी रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. यातील १०३ गावांची वर्गवारी पूर्ण झाली आहे. यात अतिधोकादायक, मध्यम, सौम्य धोकादायक अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
- सागर पाठक, अधिकारी,
आपत्ती व्यवस्थापन, रायगड
दरडींचा धोका असलेली गावे
अलिबाग - ६
मुरूड -६
पेण - १०
पनवेल - ३
उरण - १
कर्जत - ४
खालापूर - ८
रोहा - १६
सुधागड - ३
माणगाव - ७
श्रीवर्धन - ७
म्हसळा - ६
महाड - ७५
पोलादपूर- ५९
---
एकूण - २११
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35433 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..