
कोरोनामुळे अनाथ झालेल्या २६ बालकांना केंद्राची मदत
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३ : कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना पीएम चाईल्ड केअर योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. रायगड जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या २६ बालकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ही मुले १८ वर्षाची होईपर्यंत पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. या बालकांचा पीएम चाईल्ड केअर योजनेचा बॅंक पासबुक आणि हेल्थकार्ड रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पोच झाले असून याचे वाटप लवकरच केले जाणार आहे.
कोरोनामुळे रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ६९८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या २६ बालकांची निवड पीएम चाईल्ड केअर योजनेसाठी करण्यात आली आहे. ही मुले १८ वर्षांपेक्षा लहान आहेत. ती सज्ञान होईपर्यंत त्यांचे पालकत्व सरकारने स्वीकारले आहे.
पीएम चाईल्ड केअर योजनेचे खातेबुक आणि हेल्थ कार्ड पंतप्रधान कार्यालयाकडून रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. सोमवारी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अमित सानप यांनी खातेबुक स्वीकारले. आता काही दिवसातच मुलांना खातेबुकसह हेल्थकार्डचे वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.
बालकांच्या रक्षणासाठी टास्क फोर्स
बालकांचे शोषण होऊ नये म्हणून सरकारच्या वतीने टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली असून पोलिस, आरोग्य, महिला आणि बाल कल्याण विभागांच्या वतीने त्यांना आवश्यक मदत केली जात आहे. ही मुळे सज्ञान होईपर्यंत सर्व जबाबदारी सरकारची असेल. केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होईल.
हेल्थ कार्ड आणि बॅंक पासबुक जिल्हाधिकारी कार्यालयात थेट पीएम कार्यालयाकडून पोस्टाने पाठवण्यात आली आहे. त्यांचे वाटप महिला आणि बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून होणार आहे. वाटपाचा कार्यक्रम शक्यतो एकाच दिवशी होणार असून कोणत्या दिवशी होणार, यासंदर्भात आम्हाला अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
- अमित सानप, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35466 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..