चार तालुक्यांमध्ये पाणीसंकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार तालुक्यांमध्ये पाणीसंकट
चार तालुक्यांमध्ये पाणीसंकट

चार तालुक्यांमध्ये पाणीसंकट

sakal_logo
By

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पाणी टंचाईच्या झळा जिल्ह्यातील नागरिकांना जाणवू लागल्या आहेत. अलिबाग, पेण, खालापूर, महाड या चार तालुक्यांतील १६८ ठिकाणी तर पाणी टंचाईचे संकट सुरूही झाले आहे. टंचाईग्रस्त ३४ गावे, १४९ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून १९ टॅंकरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे ११ कोटी ३९ लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यात टंचाईग्रस्त गावे वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नळ पाणी योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरी खोदणे, विहिरींमधील गाळ काढणे, तसेच इतर उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली. सुरुवातीला अलिबागसह, पेण तालुक्यातील २१ गावे व ८८ वाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली. या ठिकाणी १२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. धरणांमधील पाणी कमी होऊ लागल्याने पाणी टंचाईचे संकट वाढू लागले आहे. अलिबाग, पेण तालुक्यांसह आता खालापूर व महाड तालुक्यांमध्ये पाणी संकट निर्माण झाले आहे. पाण्यासाठी महिलांना डोक्यांवर हंडे घेऊन वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी प्लास्टिकचे ड्रम घेऊन दीड ते दोन किलोमीटरपर्यंत पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
दिवसेंदिवस पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागल्याने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कंबर कसण्याची वेळ आली आहे. टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमधील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी प्रशासनाकडून टॅंकरची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खालापूर तालुक्यातील पाच गावे आणि दोन वाड्यांमध्ये एक टॅंकर, तसेच महाड तालुक्यातील आठ गावे आणि ५९ वाड्यांमध्ये पाच टॅंकरमार्फत पाणी पुरवठा करण्याची सोय करण्यात आली आहे. अलिबाग, पेण, खालापूर, महाड या चार तालुक्यांतील १४९ वाड्यांसह ३४ गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाईवर दृष्टीक्षेप
तालुके - गावे - वा़ड्या - टॅंकर
अलिबाग - ०२ - ०० - ०१
पेण - १९ - ८८ - १२
खालापूर - ०५ - ०२ - ०१
महाड - ०८ - ५९ - ०५
-------------------------

धरणांमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. पाणी नसल्याने एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तासन् तास रांगेत उभे राहून ड्रममधून पाणी आणत आहोत. पाण्याचा दुष्काळ सुरू झाल्याने प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने हे संकट कायमचे सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करावी.
- प्रकाश पाटील, ग्रामस्थ
---------------------------------

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून टॅंकरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी नियोजन केले आहे. गावांमध्ये विहिरींमधील गाळ काढणे, विहिरी खोदणे अशा प्रकारची कामे करून पाणी संकट दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता,
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35476 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top