गावठाणांचे भूमापन युद्ध पातळीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावठाणांचे भूमापन युद्ध पातळीवर
गावठाणांचे भूमापन युद्ध पातळीवर

गावठाणांचे भूमापन युद्ध पातळीवर

sakal_logo
By

प्रमोद जाधव ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ ः गावठाण जागेच्या निश्‍चितीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून गावठाणांचे भूमापन गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केले आहे. आतापर्यंत ड्रोनद्वारे अलिबाग, कर्जत, खालापूर, पनवेल, महाड या पाच तालुक्यांतील ७३७ गावांचे भूमापन झाले आहे. गावठाण जागांचे ड्रोन भूमापन युद्धपातळीवर सुरू असून ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित तालुक्यांतील भूमापन जूनपर्यंत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या ‘स्वामित्व’ योजनेंतर्गत हा उपक्रम असून ग्रामविकास अधिकारी, भूमी अभिलेख आणि महसूल या तीन विभागांतर्गत करण्यात येत आहे.
मुंबईतील भूमी अभिलेख कार्यालयासह रायगड जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापन अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने हे भूमापन केले जाणार आहे. गावठाण जागेच्या ठिकाणी चुन्याने मार्किंग करणे; त्यानंतर ड्रोनद्वारे भूमापन करणे, ही सर्व प्रकिया झाल्यानंतर सर्व्हे ऑफ इंडियाकडून त्याचा नकाशा देणे. सर्वे झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी करून तक्रारी असल्‍यास सुनावणी घेणे, मॅपिंग करून सर्व्हे ऑफ इंडियाकडून मालमत्ता कार्ड देणे ही प्रक्रिया करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील एक हजार ६७४ गावे व एक हजार १८७ पाड्यांचे गावठाण सीमा निश्चिती केली जाणार आहे. गावठाण जागेची सीमा रेषा निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२१ पासून ड्रोनद्वारे भूमापन सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला खालापूर तालुक्यातील गावांची निवड करण्यात आली. त्यानंतर कर्जत, अलिबाग, पनवेल व महाड या तालुक्यांतील गावांची निवड करण्यात आली असून येथील गावांचे भूमापन पूर्ण झाले आहे. आतापर्यंत खालापूरमधील १०३, कर्जतमधील १८३, अलिबागमधील १३९, पनवेलची ९३, तर महाडमधील १७७ गावांत असे एकूण ७३७ गावांचे भूमापन करण्यात आले असून उर्वरित पोलादपूर, पेण, श्रीवर्धन, म्हसळा, उरण, सुधागड, तळा, माणगाव, मुरूड, रोहा या १० तालुक्यांतील गावठाण जागांचे लवकरच भूमापन केले जाणार आहे.

जमीन मोजणीचे काम जलद गतीने होण्यासाठी ड्रोन मॅपिंग ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ड्रोनद्वारे गावठाण जागांचे भूमापन करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली आहे. आतापर्यंत ५० टक्के गावांचे भूमापन झाले आहे. उर्वरित गावांचे लवकरच भूमापन होईल.
- सचिन इंगळी,
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख.

ड्रोनद्वारे होणार भूमापन
उरण - ३५
पेण - १३१
मुरूड - ५९
रोहा - १६४
सुधागड - ९७
माणगाव - १७१
तळा - ६६
श्रीवर्धन - ४६
म्हसळा - ८३
पोलादपूर - ८५

भूमापन झालेली गावे
तालुके - गावे
पनवेल - १३५
कर्जत - १८३
खालापूर - १०३
अलिबाग - १३९
महाड - १७७


गावठाण जागांवर दृष्टिक्षेप

रायगडमधील एकूण गावे - १६७४
ड्रोनने सर्व्हे गावे - ७३७
नगर भूमापन झालेली गावे - ११६

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35480 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top