उमटे धरण अद्याप ‘गाळात’च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमटे धरण अद्याप ‘गाळात’च
उमटे धरण अद्याप ‘गाळात’च

उमटे धरण अद्याप ‘गाळात’च

sakal_logo
By

अलिबाग, ता. ५ (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. गाळ काढण्यास जिल्हा परिषद प्रशासन उदासीनता दाखवत असून हा प्रश्न सोडविण्यासाठी आता केंद्र सरकारकडे साकडे घालण्यात आले आहे. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे रायगड जिल्हा भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील सुडकोलीपासून आक्षीपर्यंतच्या ६३ गावांना उमटे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या उमटे धरणातील पाण्यावर सुमारे ४५ हजार नागरिक अवलंबून आहेत. पाण्याने तळ गाठल्‍याने धरणातून गेल्‍या काही दिवसांपासून दूषित पाणी येत आहेत. धरणातील गाळ न काढल्याने दर वर्षी पाण्यासाठी परिसरातील नागरिकांना वणवण करावी लागत आहे.
सद्यस्‍थितीत धरणामध्ये फक्त १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. धरणामध्ये जलसाठा कमी झाल्याने मातीमिश्रित, गढूळ पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
गेल्‍या अनेक वर्षांपासून धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. भारतीय जनता पक्षाचे अलिबाग तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष अशोक वारगे यांनी पुढाकार घेत केंद्राकडे हा प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घातले असून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांना नुकतेच याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या वेळी शिष्‍टमंडळात भाजप दक्षिण रायगडचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष अशोक वारगे, अजिंक्य पाटील, भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, जगदीश घरत, हेमंत दांडेकर, समीर राणे, सुजित गावंड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

खर्चासाठी जलसंपदा विभागाची मदत
उमटे धरणातील गाळ काढण्याचा खर्च जिल्हा परिषदेला परवडणारा नाही. त्‍यामुळे राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या मदतीने गतवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली होती; परंतु पावसाने लवकर हजेरी लावल्‍याने गाळ काढण्यात अडथळा निर्माण झाला.

साधनसामुग्री नसल्‍याने अडचणी
धरणातील गाळ २०२२ तरी काढण्यात येईल, अशी अपेक्षा होती; मात्र नवे वर्ष सुरू होऊन महिने झाले, तरी गाळ काढण्याचे काम सुरूच झालेले नाही. जलसंपदा विभागाची साधनसामुग्री अन्य ठिकाणी हलविण्यात आल्याने धरणातील गाळ काढण्यात आला नसल्‍याचे सांगण्यात येत आहे. गाळ न काढल्याने परिसरातील धरणातील पाणीसाठ्याची क्षमता कमी झाली आहे. परिणामी उन्हाळा सुरू होताच लगतच्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35500 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top