
ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच
ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच
जिल्ह्यातील २६० ठिकाणी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
अलिबाग, ता. ५ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यातील जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर २०२१ मध्ये मुदत संपलेल्या व डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींत प्रभाग रचनेचा कार्यक्रम घेतला जाणार असून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे, प्रभाग रचना अंतिम करणे अशी तालुका, उपविभागीय व जिल्हास्तरावर प्रक्रिया चालणार आहे. ९ मेपासून ते ५ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. दरम्यान तहसीलदारांनी गावाचे नकाशे अंतिम करणे, तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे. सीमा निश्चित करणे, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे, प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देऊन तहसीलदार यांनी हरकती व सूचना मागवण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करणे, प्राप्त हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेणे, त्यानंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करणे आदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
१ जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम करणे आणि राज्य निवडणूक आयोगाला ते सादर करणे. पाच जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी देणे, असा कार्यक्रम होणार आहे.
प्रशासकावर अतिरिक्त कामाचा भार
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसविण्यात आला आहे. त्यामुळे गावातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. ग्रामपंचायतीवर प्रशासक बसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. आता लवकरच ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. ग्रामविकास विभागाने मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने प्रस्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35502 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..